ठाण्यात कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 05:07 PM2019-09-01T17:07:11+5:302019-09-01T17:10:13+5:30
मुग्धा चिटणीस-घोडके कला-सांस्कृतिक प्रतिष्ठान, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि व्यास क्रिएशन्स् आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
ठाणे ः कथाकथनकार आणि चित्रपट नायिका दिवंगत मुग्धा चिटणीस-घोडके हिच्या स्मृत्यर्थ झालेल्या आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याच समारंभप्रसंगी व्यास क्रिएशन्सतर्फे अशोक चिटणीस लिखित ‘साप आणि शिडी’ या कथासंग्रहाची चौथी आवृत्ती आणि डॉ. शुभा चिटणीस लिखित महाराष्ट्रातील 16 वृद्धाश्रमांचा परिचय करून देणार्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
कथाकथन स्पर्धेतीलतत शालेय गटात ठाण्यातील ए. के. जोशी स्कूलच्या आबोली शिंदे हिला रु. 1000/- चे पहिले पारितोषिक, एस.व्ही.पी.टी.च्या अनन्या देसवंडीकर हिला रु. 750/- चे दुसरे पारितोषिक आणि डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलच्या रिया कुलकर्णी हिला रु.500/- चे तिसरी पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन गटात जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या किमया तेंडुलकर हिला रु.1000/- चे पहिले पारितोषिक, डोंबिवलीच्या प्रगती विद्यालयाच्या यश पवारला रु. 750/- दुसरे पारितोषिक आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या ममता सकपाळला तिसरे पारितोषिक मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक आणि प्रथम क्रमांकांच्या शाळा-महाविद्यालयास कायमस्वरुपी चषक डॉ. विजया वाड, प्रा. अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, डॉ. उदय निरगुडकर, आमदार प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कथाकथन स्पर्धेविषयी आपल्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. प्रा. प्रदिप ढवळ यांनी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन मार्गदर्शन शिबिराची आवश्यकता असल्याचे सांगितले. लेखक, कथाकथनकार, प्राचार्य अशोक चिटणीसांनी मुग्धाच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा आणि कथाकथनकार म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांचा परिश्र, पाठांतर, वक्तृत्त्व, अभिनय आणि कथेची साक्षेपी निवड कशी आवश्यक आहे हे अनुभवातून सांगितले. स्पर्धेच्या परिक्षकांच्या वतीने लेखिका माधवी घारपुरे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. डॉ. शुभा चिटणीस यांनी ‘आनंदसंध्या’च्या लेखनकाळात भेट दिलेल्या विविध वृद्धाश्रमांची वैशिष्ट्ये सांगून वृद्धाश्रमांची आवश्यकता सांगितली. मात्र वृद्धाश्रमांची संख्येतील होणारी वाढ ही समाजाच्या निकोप शरीराच्या दृष्टीने खंत वाटावी अशीच गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रकाशक नीलेश गायकवाड यांनी प्रकाशन व्यवसायाची आजची वास्तवता सांगून लेखक-लेखिकेचा सत्कार व्यास क्रिएशन्स् तर्फे केला. सिने-दिग्दर्शक राजदत्त यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विजया वाड, आमदार प्रताप सरनाईक आणि अभ्यासू पत्रकार, डॉ. उदय निरगुडकर या सर्वांनी मुग्धा, कथाकथन आणि अशोक व डॉ. शुभा चिटणीस यांच्या लेखनशैलीविषयी व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्तवाविषयी आपले विचार रंगतदार, शैलीदार पद्धतीने मांडले. कथाकथन व वृद्धाश्रमासंबंधी डॉ. उदय निरगुडकरांनी अत्यंत अभ्यासूपणे मांडलेले विचार सर्वांना भावले. प्रफुल्ल चिटणीसांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर हा रंगलेला कार्यक्रम विराम पावला.