प्रोबेस स्फोट प्रकरण : फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा
By admin | Published: September 23, 2016 03:09 AM2016-09-23T03:09:06+5:302016-09-23T03:09:06+5:30
एमआयडीसीमधील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या स्फोटानंतर फॉरेन्सिकतज्ज्ञांनी गोळा केलेले अवशेष तपासणीकरिता लॅबमध्ये धाडले असून त्याचा अहवाल साडेतीन
डोंबिवली : एमआयडीसीमधील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत २६ मे रोजी झालेल्या स्फोटानंतर फॉरेन्सिकतज्ज्ञांनी गोळा केलेले अवशेष तपासणीकरिता लॅबमध्ये धाडले असून त्याचा अहवाल साडेतीन महिने उलटले तरी अजून प्राप्त झालेला नाही. शिवाय, त्यास आणखी किती कालावधी लागेल, तेही स्पष्ट नसल्याने याबाबतच्या तपासाकरिता नियुक्त केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल जाहीर होऊ शकणार नाही.
प्रोबेस स्फोटाचा अहवाल कधी येणार, असा सवाल केला असता त्यास आठवडा, महिना, सहा महिनेदेखील लागू शकतात, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात चौकशी समितीचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही फॉरेन्सिक अहवाल नसल्याने तपास समिती कूर्मगतीने शोध घेत आहे.
दरम्यान, एकीकडे प्रोबेस स्फोटाच्या चौकशीला गती प्राप्त होत नसताना रविवारी रसायनमिश्रित लाल सांडपाणी डोंबिवलीतील नाल्यात सोडल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. या परिसरातील अनेकांना श्वसनाचा त्रास झाला. मात्र, ते पाणी नेमके कोणी सोडले, याबाबतही गुप्तता पाळली जात असून ठोस कारवाई केलेली नाही.
केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून प्रदूषण मंडळ शांत कसे बसू शकते, येथे नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, असा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. त्याच दिवशी सुटीच्या निमित्ताने बंद असलेल्या ‘हिंदुस्थान मोनोमर्स’ या कंपनीतून वायुगळती झाल्याने परिसरातील अन्य कंपन्यांच्या ९ कामगारांना त्रास झाला. पण, ती गळती झालीच कशी? त्यात कंपनीत नेमके कोण होते, हे सवालही अनुत्तरीतच आहेत.