मनसेने काढली ‘प्रोबेस स्मरणयात्रा’

By Admin | Published: May 4, 2017 05:41 AM2017-05-04T05:41:53+5:302017-05-04T05:41:53+5:30

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीच्या भीषण स्फोटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप भरपाई मिळालेली

'Probes Smaranayatra' removed by MNS | मनसेने काढली ‘प्रोबेस स्मरणयात्रा’

मनसेने काढली ‘प्रोबेस स्मरणयात्रा’

googlenewsNext

 कल्याण : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीच्या भीषण स्फोटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. त्याच्या निषेधार्थ मनसेने बुधवारी कल्याणमध्ये प्रोबेस स्मरणयात्रा काढली. यावेळी मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांना बदाम भेट देण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकातून तहसीलदार कार्यालयावर ही यात्रा काढण्यात आली. त्यात, केडीएमसीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, मनसेचे गटनेते मंदार हळबे, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई, सरोज भोईर, नगरसेवक राजन मराठे आदी पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तहसीलदार किरण सुरवसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी बदामाचे पाकीट सुरवसे यांच्याकडे दिले.
प्रोबेस स्फोटातील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत दिलेली आश्वासने मुख्यमंत्री वारंवार विसरतात. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. बदाम खाल्ल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढेल आणि ते भरपाई देण्याचा निर्णय घेतील. प्रोबेस स्फोटाला २६ मे रोजी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी भरपाई देण्याचा निर्णय न घेतल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल, अशा इशारा देण्यात आला.
स्फोटाचा अहवाल तातडीने सादर करावा. डोंबिवलीतील अतिधोकादायक व घातक रसायानांचे उत्पादन करणारे कारखाने स्थलांतरित करावेत. त्याऐवजी तेथे आयटी, बीपीओ, आयटीईसीसारख्या कंपन्या आणाव्यात. आयटी कंपन्या आल्यास डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. रासायनिक कारखान्यांतील प्रदूषित सांडपाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था नसल्याने ते नाल्यात सोडले जाते. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. त्याच सांडपाण्यावर भाज्या पिकवल्या जातात. अनेक कंपन्यांनी त्यांच्या आवारात बेकायदा बांधकाम केले असून ते तोडावे. प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक शाखा डोंबिवलीत सुरू करावी, या मागण्याही या वेळी मनसेने केल्या.
स्फोटानंतर महसूल विभागाने नुकसानभरपाईचे पंचनामे केले. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. भरपाई देण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे. त्यामुळे मनसेचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवले जाईल, असे सुरवसे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. (प्रतिनिधी)



१०० नागरिकांचाच सहभाग : भरपाईसाठी पंचनामा केलेल्यांचा आकडा दोन हजार ६६४ इतका असला, तरी प्रोबेस स्मरणयात्रेत केवळ १०० नागरिकांनीच सहभाग दर्शवला. त्यामुळे अन्य लोकांना भरपाई मिळवण्याविषयी स्वारस्य नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे त्यांचा विश्वास उडाल्याने हेच का ते भाजपाचे गतिमान सरकार, असा सवाल केला जात आहे.

शिवसेनेची मनसेवर टीका : प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटना घडल्यापासून पाठपुरावा केला आहे. भरपाई देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. एखादे काम होत आल्यावर त्याचे श्रेय लाटण्याची मनसेला पहिल्यापासून सवय आहे. त्यासाठी नौटंकी करणे, बॅनरबाजी करणे, स्टंटबाजी करणे, हे सगळे मनसे करते. त्यामुळे त्यांना जनतेने निवडणुकीत नाकारले आहे. ‘असतील शिते तर जमतील भुते’, अशी मनसेची गत झाली असल्याची टीका शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी केली आहे.

कर्ज काढून उपचार सुरू...

१ज्येष्ठ नागरिक मालती निंबाळकर यांचा मुलगा महेश हा प्रोबेस स्फोटात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हात व पाय गमावण्याची वेळ आली. त्याला उपचारासाठी मदत मिळालेली नाही. त्यामुळे कर्ज काढून महेशवर उपचार करण्याची वेळ निंबाळकर कुटुंबीयांवर ओढवली आहे.
२मालती यांच्यासह त्याची पत्नी, दोन मुली, बहिणीची एक मुलगी त्यांच्या घरी राहत आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आज निंबाळकर कुटुंबाला सतावत आहे.
३राजेश तुपे, शोभा केदारे, अनंत भोसले हे गणेशनगरात राहतात. ते राहत असलेल्या मयूरेश दर्शन या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले होते. ही इमारत स्फोटामुळे हादरली होती. चौथ्या मजल्याचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

Web Title: 'Probes Smaranayatra' removed by MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.