दिव्यात ओठात हुंदके, घरात दुर्गंधी आणि अंगात ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:21 AM2019-08-13T00:21:03+5:302019-08-13T00:23:24+5:30
बहुतांश लोकांचे हातावर पोट असल्याने दिव्यातील हजारो कुटुंबांनी पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. मात्र, हा संघर्ष केवळ वस्तू, सामानसुमान गमावल्यापुरता नाही.
- कुमार बडदे
आयुष्यभर खूप कष्ट करून एकेक रु पया जमा करून उभा केलेला संसार रात्री घरात शिरलेल्या पाण्याबरोबर वाहून जाताना पाहिला, हे सांगताना कविता सावंत यांना हुंदका आवरला नाही. त्यांनी डोळ्याला पदर लावला आणि अक्षरश: एखाद्या लहान मुलीसारख्या रडू लागल्या. शाळेच्या भिजलेल्या वह्या न्याहाळत बसलेला इयत्ता सातवीमधील मधुकर शून्यात नजर लावून बसला होता. त्याची विमनस्क स्थिती त्याच्या चेहऱ्यावर सहज वाचता येत होती. दिव्यात कुठल्याही घरात गेलात तर डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि सर्व काही हरवल्याची उदासीनता शेकडो चेहऱ्यांवर दिसते. अर्थात, बहुतांश लोकांचे हातावर पोट असल्याने दिव्यातील हजारो कुटुंबांनी पुन्हा जगण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे. मात्र, हा संघर्ष केवळ वस्तू, सामानसुमान गमावल्यापुरता नाही. मूलभूत गरजा भागवण्याचा, आरोग्य सुविधा नसल्याने जगण्यामरण्याचा आहे. हा संघर्ष करीत असताना त्यांची मोठी ओढाताण होत आहे.
पाणी शिरलेल्या बहुतांश घरांमधील संपूर्ण संसार पाण्यात वाहून गेले आहेत. अशा किती कुटुंबांना कोणत्या प्रकारची मदत देण्यात येणार, याबद्दल काही ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले ठामपाचे अधिकारी, कर्मचारी हे स्वत:च अनभिज्ञ असल्याने सर्वस्व गमावलेल्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना थातूरमातूर मदत केल्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात येणार अशीच जनभावना आहे. आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आपद्ग्रस्तांची संसार नव्याने उभा करताना मोठ्या प्रमाणावर दमछाक होणार आहे. काही दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे बारवी धरणामध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने रविवार, ४ आॅगस्ट रोजी धरणामधील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे खाड्यांमधील पाण्याची पातळी वाढली. त्याचवेळी समुद्राला भरती आल्याने खाडीमधील पाणी कांदळवन नष्ट करून बांधलेल्या दिव्यातील साबेगाव, साळवीनगर, वक्र तुंडनगर, बी.जे.नगर आदी परिसरातील २२ हजार घरांमध्ये शिरले. घरांच्या आजूबाजूला क्षणाक्षणाला वाढत असलेले पाणी बघून अस्वस्थ झालेल्या आपद्ग्रस्तांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने घरातील वस्तू आहेत, त्याच अवस्थेत सोडून जवळ असलेल्या इमारतीमधील रिकाम्या सदनिका तसेच टेरेसचा आसरा घेतला. विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी तेथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती.
घरामधील वस्तू पाण्यावर तरंगत वाहत असल्याचे बघून अनेकांच्या घशात घास अडकला. फक्त जगण्यासाठी दोन घास पोटात ढकलायचे म्हणून आम्ही जेवलो, असे काही महिलांनी सांगितले. दोन दिवसांनी पाणी ओसरल्यानंतर पुन्हा घरांकडे परतल्यावर घराची दुरवस्था बघून आमच्या डोळ्यांत अश्रू ओघळत होते. पाण्याच्या लोंढ्यासोबत हौसेमौजेने जमा करून ठेवलेल्या अनेक आठवणींचा ठेवा वाहून गेला, हे सांगताना शांताबार्इंचा कंठ दाटून आला. पाण्यामध्ये बहुतांशी घरांमधील फ्रीज, टीव्ही नादुरुस्त झाले. गाद्या, चादरी तसेच धान्य वाहून गेले. पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्यात. भिजलेल्या सामानांचा खच ठिकठिकाणी रस्त्यावर पडल्याने घरांमध्ये तसेच रस्त्यावर पसरलेल्या कुबट दर्पामुळे या परिसरात राहणे दूरच राहिले, पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे. चाळीमधील अनेक जण सर्दी, खोकला तसेच तापाने आजारी पडले असून यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे, असे साबे गावातील एकवीरा चाळीत राहणाºया कविता ओमनदार यांनी सांगितले. पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर आणि आता ते ओसरल्यानंतर एकही लोकप्रतिनिधी साधी विचारपूस करण्यासाठी आलेला नसल्याबद्दल अनेकजण तीव्र नापसंती व्यक्त करतात. पाण्यामध्ये एकच महिन्यापूर्वी खरेदी केलेली वह्या, पुस्तके, शैक्षणिकसाहित्य भिजल्यामुळे ते वापरण्यायोग्य राहिलेले नाही. ते पुन्हा खरेदी करावे लागणार आहे. पुन्हा सर्व अभ्यास उतरवून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे अभ्यासाचे प्रचंड नुकसान होणार आहे, असे चाळीत राहणाºया व महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेल्या चैत्रेश म्हसकर याने सांगितले. पुरात मार्कशिट, दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी महत्त्वाचे दस्तावेज वाहून गेल्याने ते परत मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या चौकशा तसेच प्रक्रि यांना सामोरे जावे लागणार असल्याची भीती म्हसकर याने व्यक्त केली.
दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दूध व इतर नाशिवंत वस्तू ठेवण्यासाठी असलेले फ्रीज नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे अशा नाशिवंत वस्तू कुठे ठेवायच्या, असा प्रश्न दुकानदारांना पडलाय. त्यामुळे पूर ओसरला तरी दिव्यात अनेक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध नाहीत, अशी कबुली सैतानसिंह राठोड या जनरल स्टोअर्सचालकाने दिली. साबेगावात दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या अनेक चाळींमधील घरांपर्यंत पोहोचण्यासाठी पायवाटा बांधण्यात आलेल्या नाहीत. पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे रात्रीच्या वेळी मोबाइलच्या उजेडात दगडधोंड्यांमधून घर गाठावे लागते. पावसाचे पाणी बिळात शिरल्याने काहीवेळा पायाखाली काहीतरी वळवळल्याचा भास होतो. जीवाचा थरकाप उडतो, अशी माहिती मधुकर तरळ यांनी दिली. साबेगावातील आपद्ग्रस्तांची नावे बुधवारी ठामपाच्या अधिका-यांनी लिहून नेली. परंतु, मदत कुठल्या स्वरूपाची आणि कधी मिळणार, असा संतप्त सवाल भगीरथ शाहू या दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाने उपस्थित केला.
पाण्यामुळे भिजलेल्या वस्तू कचरागाडीत टाकून नेण्याकरिता महापालिकेचे सफाई कर्मचारी पैशांची मागणी करतात, असा आरोप त्यांनी केला. दुकानांमध्ये शिरलेले पाणी तसेच मातीचा गाळ साफ केल्यानंतर हाताला खाज सुटल्याने दोन दिवस झोप लागली नसल्याची माहिती साळवीनगरमधील ज्ञानेश्वर पाटील या हार्डवेअरचे सामान विकणाºया दुकानमालकाने दिली. याच चाळीत राहणाºया फौजदार यादव यांच्या घरामध्ये शिरलेल्या पाण्याच्या उग्र वासामुळे त्यांचा भाऊ राजेंद्र आजारी पडला आहे. तीन वर्षांपूर्वी मुंब्य्रातील कैलासनगर परिसरात राहणाºया यादवबंधूंनी साळवीनगरमध्ये जेथे घर विकत घेतले, ती जमीन आपल्या मालकीची असल्याचे घर विकणाºया विकासकाने सांगितल्यामुळे त्यांनी घर विकत घेतले. परंतु, सदरची जमीन खरोखरच विकासकाच्या मालकीची आहे का, याची शासकीय दफ्तरी खातरजमा केली नसल्याचे कबूल केले. पावसामुळे जलवाहिन्या खराब झाल्याने घरामध्ये पाणी येत नसल्यामुळे पिण्यासाठी दररोज ५० रुपये मोजून २० लीटर पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे यादवबंधूंनी सांगितले.
दिव्यातील घराघरांत सध्या हीच कहाणी ऐकायला मिळते. घराघरांत लोक फरशीची किंवा भिंतीची साफसफाई करताना दिसतात. प्रत्येक घरासमोर भिजलेल्या वस्तूंचा ढीग पडलेला आहे आणि घराघरांत आबालवृद्धांना ताप चढला असल्याने सारे शहर रोगट व आजारी दिसत आहे.