आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी
By admin | Published: February 1, 2017 03:47 AM2017-02-01T03:47:59+5:302017-02-01T03:47:59+5:30
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती.
ठाणे : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने आणि एकाही पक्षाकडून अद्यापही उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने ज्या वेळेस ही यादी जाहीर होईल त्यानंतर तर आॅनलाईनवर झुंबड उडणार असल्याचे चित्र असणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारे जर सर्व्हर डाऊन होत राहिले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आता इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यातही बंडखोरी रोखण्यासाठी अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी किंबहुना मनसेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. शिवसेना आणि भाजपाची यादी २ फेब्रुवारी आणि त्यात दिवशी सांयकाळी उशिरा काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या उमेदवाारंची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहणार आहे. त्यामुळे अशा वेळी आॅनलाईनवर मोठी झुंबड उडणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील दहा महापालिकांसाठी अशा प्रकारे एकच साईट असल्याने त्याठिकाणी इतर मनपामधील उमेदवारांचीही अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. अशा वेळी जर सर्व्हर डाऊन झाले तर अर्ज भरायचे कसे असा सवाल आहे.