रस्ता रुंदीकरणाची कारवाई दोन दिवसात सुरु होणार, आयुक्तांनी दिले संबधींत विभागाला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:07 PM2019-01-01T18:07:03+5:302019-01-01T18:09:00+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली जाणार आहे. यामध्ये ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे पाडली जाणार आहेत.
ठाणे - मागील सरत्या वर्षात थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई ठाणे महापालिकेने नव्या वर्षात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील डीपी रोड अंमलबजावणी करणे तसेच रस्ता रुंदीकरणातंर्गत बाधित बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दिले.
मागील दोन वर्षात ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले. यामध्ये पोखरण रोड नं. २, तीन आदींसह स्टेशन परिसर, शास्त्री नगर ते हत्तीपुल, मुंब्रा, कळवा, घोडबंदर आदी भागात रस्त रुंदीकरणाची कारवाई मोठ्या जोमाने करण्यात आली. या कारवाईला कुठेही विरोध झाला नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांच्या या कामाचे कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा केले होते. त्यानंतर मागील काही महिने थांबलेली रस्ता रुंदीकरणाची कारवाई आता पुन्हा एकदा नव्या वर्षात सुरु करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी यासंदर्भात आढावा घेवून विकास योजनेतंर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दोन दिवसांत कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्तांनी शहरातील सर्व रस्ते रु ंद मोकळे करण्यासाठी त्यामध्ये बाधीत सर्व बांधकामावर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाई अंतर्गत एम एम व्हॅली ते कल्याण रोड, कल्याण फाटा दत्त मंदिराच्या पाठीमागील रस्ता, तावशी रस्ता, दिवा आगासन जंक्शन ते दिवा स्टेशन, वाघबीळ रस्ता, नामदेववाडी टी.पी.स्कीम रस्ता, रस्ता क्र . ३३ वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल, रस्ता व रस्ता क्र .१६ या रस्त्यावरील एकूण ८०० रहिवास व ३३८ वाणिज्य बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत.