छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 01:19 AM2019-06-02T01:19:14+5:302019-06-02T01:19:38+5:30
शहराच्या लौकिकात भर । किसन कथोरे यांची संकल्पना
मुरबाड : मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शहरातील एक ऐतिहासिक निर्णयाची पूर्तता होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक शनिवारी तीनहातनाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार कथोरे, नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, नगरसेवक मोहन सासे, नारायण गोंधळी, किसन कथोरे, नितीन अण्णा तेलवणे, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.
मुरबाड नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहरात विविध विकासकामे होत आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करणे व या चौकात महाराजांचा भव्य पुतळा उभा करावा, असा संकल्प आमदार कथोरे यांनी केला होता. याची पूर्तता होत असून मुंबईतील शिल्पकार जयप्रकाश शिरगावकर यांनी हा अश्वारूढ पुतळा बनवला आहे. तीनहातनाका ते शिवाजी महाराज चौकापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढून हा पुतळा बांधकाम करण्यात आलेल्या चौथऱ्यावर बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच केले जाणार असल्याचे खासदार पाटील व कथोरे यांनी सांगितले. मुरबाड रेल्वे २०२३ पर्यंत सुरू होईल, असे पाटील म्हणाले.