विद्यार्थ्यांना पाटावर बसवून काढली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:19 AM2019-06-18T00:19:40+5:302019-06-18T00:19:51+5:30
बापसई जि. प. शाळेचा उपक्रम; शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या पायांचे घेतले ठसे
कल्याण : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बापसई शाळेने प्रथमच शाळेत पाऊल ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे सोमवारी एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. शाळेची त्यांना गोडी लागावी, यासाठी त्यांची पाटावर बसवून मिरवणूक काढण्यात आली. तसेच त्यांच्या पायांचे ठसेही घेतले. शिक्षणाचे त्यांचे पहिले पाऊल या अर्थाने हा उपक्रम राबविला गेला. हे सगळे पाहून विद्यार्थ्यांना शाळेत काही तरी वेगळे घडत असल्याचे जाणवले.
मराठी शाळा बंद पडत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. अशा शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला नसतो, असे पालकांचा समज असतो. त्यावर मात करण्यासाठी जि.प.च्या बापसई शाळेने विद्यार्थ्यांची पाटावर बसवून मिरवणूक काढली. शाळेच्या पहिल्या दिवशी राबवलेला हा उपक्रम सगळ्यांचे लक्षवेधून घेणारा ठरला. पाटावर बसवून गणपतीची मिरवणूक काढली जाते हेच विद्यार्थ्यांना माहिती होते. मात्र, त्यांचीच अशा प्रकारे मिरवणूक काढल्याने त्यांनाही अप्रूप वाटले. काही वेळेसाठी ते स्वत:च बाप्पा झाल्याचे त्यांना वाटले. शाळेत आल्यानंतर त्यांच्या पायांचे ठसे पाटावर पांढरा कागद ठेवून घेण्यात आले. हा कागद विद्यार्थ्यांना देण्यात आला. शिक्षणाचे त्यांचे पहिले पाऊल यशस्वी होवो, असा शुभसंदेश शिक्षकांनी यावेळी दिला. त्यावेळी पालकांच्या चेहºयावर आनंद फुलला. मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
शहरातील शाळा पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबवतात. मात्र, त्याला छेद देणारा हा उपक्रम आम्ही राबवल्याची माहिती शिक्षक अंकुश लहारे यांनी दिली. याप्रसंगी समाजसेवक विशाल जाधव, सी. रिचर्ड यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात शिक्षिका प्रणिती श्रीरामे, अरुणा इसामे, सुनीता आव्हाड, संतोष मगर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनंदा टेंभे, उपाध्यक्ष कांचन टेंभे, गौरव टेंभे सहभागी झाले होते.
स्वागतासाठी कापला केक : सम्राट अशोक विद्यालयातही सोमवारचा दिवस अनोखा ठरला. मागील वर्षी १०० टक्के उपस्थिती लावलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी नव्या विद्यर्थ्यांच्या स्वागतानिमित्त केक कापण्यात आला. मुख्याध्यापक गुलाब पाटील व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांनी मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या वर्षी साईराज गांगुर्डे, आदित्य कांबळे आणि संस्कार चव्हाण या विद्यार्थ्यांनी पालकांच्या निर्णयानुसार इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे.
फुगे, मास्कचे वाटप
कल्याण पश्चिमेतील बालक मंदिर पूर्व प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना फुगे व मास्कचे वाटप केले. मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत गेले. शिशू, बालवर्गापासूनच सेमीइंग्रजी माध्यम सुरू केले आहे. यंदाच्या वर्षी मराठी माध्यमात २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका मधुरा भिडे यांनी दिली. तर, याच शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागात १२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थांचे इंग्रजी बालगीताने स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका गौरी रानडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवल्याचे शिक्षिका शीतल पडवळ म्हणाल्या.