दिव्यात ठामपा प्रशासनाविरोधात घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:45 AM2021-08-14T04:45:58+5:302021-08-14T04:45:58+5:30
मुंब्रा : ठाणे मनपाच्या क्षेत्रातील दिवा शहरात राहत असलेल्या पाच लाख नागरिकांसाठी फक्त एक कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. ...
मुंब्रा : ठाणे मनपाच्या क्षेत्रातील दिवा शहरात राहत असलेल्या पाच लाख नागरिकांसाठी फक्त एक कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. यामुळे लसीकरणासाठी येथील नागरिकांची मोठी परवड सुरू असून, ती थांबावी यासाठी येथे लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी भाजपाने काही महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने केली आहे. परंतु, प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर भाजपने हक्क दिवेकरांचा या शीर्षकाअंतर्गत निदर्शने केली. यावेळी ठामपा प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
ठामपा क्षेत्रात लसीकरणाबाबत जेथे-जेथे सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे, तेथे-तेथे पक्षातर्फे आंदोलने करण्यात येत असून, आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे गटनेते मनोहर डुबारे डुंबरे यांनी यावेळी दिली. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत आंदोलन केल्याने येत्या १५ ऑगस्टपासून लसीची दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. हे श्रेय भाजपचे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी पक्षाचे शहर उपाध्यक्ष नीलेश पाटील, सरचिटणिस मनोहर सुखदरे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.