आभासी चलनाची निर्मिती करुन २५ हजार गुंतवणूकदारांना गंडा: टोळीपैकी एकास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 07:03 PM2018-06-05T19:03:08+5:302018-06-05T19:03:08+5:30
आभासी चलनामध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून एक कोटी ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या तहा काझी याला ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. त्याने अशा २५ हजार जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.
ठाणे: आभासी चलनाची (क्रिप्टो करन्सी) निर्मिती करुन त्यात गुंतवणूकीचे अमिष दाखवून हजारो गुंतवणकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीपैकी तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. या कारवाईमध्ये फ्लिनस्टोन ग्रुपच्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयातून ५३ लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट दस्तऐवज अशी मोठी सामुग्री हस्तगत केल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘फ्लिनरस्टोन ग्रुप’चा सुत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या सहका-यांनी नियोजनबद्ध कट करुन अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्लीतील प्रविण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्याकडे केली. आॅगस्ट २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत लखनपाल आणि त्याच्या साथीदारांनी भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रतिनिधी असल्याचे बनावट व्हीजिटींग कार्ड दाखवून ‘फ्लिनरस्टोन ग्रुप’ या कंपनीच्या माध्यमातून मनी ट्रेड क्वाईन (एमटीसी) नावाने कोणताही कायदेशीर आधार नसतांना क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलनाची निर्मिती केली. नंतर त्याच आभासी चलनामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठया प्रमाणात परतावा मिळेल, असे सांगून अग्रवाल यांच्यासह इतर अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन अमित लखनपाल आणि त्याच्या टोळीने ‘एमटीसी’ या आभासी चलनामध्ये एक कोटी ७६ लाख २६ हजारांची गुंतवणूक करण्यास अनेकांना भाग पाडले. परंतू, गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार अग्रवाल यांनी ४ जून रोजी चितळसर पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी फसवणूक, अपहार, पुरावा नष्ट करणे अशा विविध भारतीय दंड संहितेच्या कलमांसह चिट फंड अॅक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री घोडबंदर रोडवरील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’ च्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे, संदीप बागुल आणि समीर अहिरराव आदींच्या पथकाने तहा काझी याला अटक केली. या सर्व कटकारस्थानाचा मुख्य सूत्रधार मनी ट्रेड कॉईन या क्रिप्टो करन्सीचा मालक अमित लखनपाल आणि त्याच्यासह पसार झालेल्या टोळीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले.