निर्माता साजिद खानला क्लीन चिट? अभिनेता अरबाज खान, निर्माता पराग संघवी होणार साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:52 AM2018-06-07T00:52:39+5:302018-06-07T00:52:39+5:30
सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती.
ठाणे : सोनू जलान या बुकीशी फिल्म इंडस्ट्रीतील संपर्कातूनच ओळख झाली. त्याला मुंबई पोलिसांनी आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्यामुळे अटक केली होती. त्यानंतर त्याच्याशी संबंध तोडले असून आपण त्याच्याशी सट्टयावर कोणतीही भागीदारी केली नसल्याचा दावा करून चित्रपट निर्माता तथा दिग्दर्शक पराग संघवी यांनी बुधवारी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळल्याने त्याच्यासह अभिनेता अरबाज खान याला आता ठाणे पोलीस या प्रकरणात साक्षीदार करणार आहेत. तसेच सात वर्षांपूर्वी बेटिंग खेळल्यामुळे निर्माता साजिद खान यालाही पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे.
पराग संघवी हे आपले भागीदार असल्याची माहिती कुख्यात सट्टेबाज सोनू जलान याने ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या चौकशीत दिली होती. याच पार्श्वभूमीवर त्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने चौकशी केली. त्यावेळी त्याने आपल्यावरील हे आरोप फेटाळून सोनूशी गेल्या दीड वर्षापासून संबंध तोडल्याचा दावा केला.
मुंबईतील जूहू येथील एका हॉटेलमध्ये पराग आणि सोनूची तीन ते चार वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणेही व्हायचे. साधारण, दीड वर्षांपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेतल्याने सोनूला अटक केली होती. तेंव्हा सोनू एक मोठा बुकी असल्याची माहिती मिळाली, पण त्यानंतर आपण त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्याच्याशी आपली क्रिकेटवरील जुगाराची कोणतीही भागीदारी नसल्याचा दावा संघवी यांनी केला. संघवी यांनी दिलेल्या जबाबाची पडताळणी केली जाणार असून त्यांचे व्यवहारही तपासले जाणार आहेत. गरज पडली तर संघवींना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाईल. चित्रपट अभिनेता अरबाज खानला या प्रकरणात साक्षीदार केले जाणार आहे. तसा जबाब भारतीय दंड संहितेच्या कलम १६४ नुसार न्यायालयासमोर नोंदविला जाणार आहे. अरबाज खान प्रमाणेच आता संघवींचाही जबाब १६४ नुसार नोंदविला जाणार असून त्यांनाही या प्रकरणात साक्षीदार केले जाणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
घटना सात वर्षांपूर्वीची...
दिग्दर्शक, निर्माता साजिद खान याचेही नाव बेटिंगमध्ये सोनूने पोलिसांच्या चौकशीत घेतले. परंतु, हा प्रकार सात वर्षांपूर्वीचा असल्याने साजिद यांना चौकशीला बोलविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे प्रदीप शर्मा यांनी स्पष्ट केले.