उल्हासनगरात व्यावसायिकांना मिळणार बाजार परवाना, महापालिकेत बाजार परवाना विभाग
By सदानंद नाईक | Published: October 14, 2023 05:47 PM2023-10-14T17:47:11+5:302023-10-14T17:50:27+5:30
उल्हासनगरात १ लाख ८७ हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी २५ हजार मालमत्ता व्यापारीतत्वावर वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका मालमत्ता विभागामार्फत यापूर्वी व्यवसाय परवाना देण्याची कार्यवाही करण्यात येत होती. मात्र याबाबत मर्यादा उघड झाल्यावर बाजार परवाने हा स्वतंत्र विभाग केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. शहरातील व्यावसायिकांना बाजार परवाने दिल्यास, त्यापासून कोट्यवधींचे उत्पन्न पालिकेला मिळणार असल्याचे संकेत नाईकवाडे यांनी दिले आहे.
उल्हासनगरात १ लाख ८७ हजार मालमत्ताधारक असून त्यापैकी २५ हजार मालमत्ता व्यापारीतत्वावर वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे. या व्यापाऱ्यांना यापूर्वी मालमत्ता विभागाच्या वतीने व्यवसाय परवाना दिला जात होता. मात्र विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता विभाग व बाजार आणि परवाना विभाग असे दोन स्वतंत्र विभाग करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या सर्व मालमत्ताचे विषय मालमत्ता विभागामार्फत हाताळले जातील. आणी शहरातील बाजार व व्यवसाय परवाने हे बाजार व परवाना विभागामार्फत दिले जाणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. परवान्यातून महापालिकेला १५ कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिका मालमत्ता कर व पाणीपट्टी कर, शासनाचे विविध अनुदान, जीएसटी अनुदान, नगररचनाकार विभागातून बांधकाम परवाने आदीच्या उत्पन्नावर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा आहे. शहर विकासासाठी पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत महापालिका आयुक्त उपलब्ध करून देत आहे. फेरीवाला स्वछता कर, अग्निशमन विभागाचा ना हरकत परवाना, मोबाईल टॉवर्स पासून मिळणारे भाडे आदीतून महापालिकेला उत्पन्न सुरू झाले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाजार परवान्यांतून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यामुळे महसुली उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. या उत्पन्नातून शहरातील नागरिकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शक्य होणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे यांचे म्हणणे आहे.