ठाण्यातील शिरीष पै काव्यकट्टयावर रंगला स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:53 PM2018-06-11T16:53:50+5:302018-06-11T16:53:50+5:30
ठाण्यात आयोजित करण्यात आलेला शिरीष पै काव्यकट्टा रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी ठाणे, मुंबई परिसरातील नवे - जुने कवी उपस्थित झाले होते.
ठाणे : शिरीष पै काव्यकट्टा, ठाणेच्यावतीने रविवारी सायंकाळी विश्रांती बंगला येथे स्वरचित काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. र. म. शेजवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित कवींना मार्गदर्शन करीत आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमादरम्यान उद्वेली बुक्स निर्मित दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. यात सना पंडित लिखीत समर्र्पण व अपर्णा मोहिले लिखीत शब्दपुष्पांजलीचे प्रकाशन डॉ. शेजवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी तू आणि मी, बॅलेन्स, राक्षस, बहावा, मराठी भूमिचा कणा, वादळ शेतकऱ्यांचे अशा मराठी - इंग्रजी कवितांचे सादरीकरण यावेळी केले. विवेक मेहेत्रे यांनी आपल्या ‘पाणी पावसात साचलेले...’, ‘पुर्वी कागदास सोप्या घड्या...’, ‘पावसास ये सांगणारे...’, ‘रेन रेन गो अवे....’ या चार चारोळ््या सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांची भरभरुन दाद मिळाली. जे कवी कागद पाहून कविता वाचतात त्यांच्या त्या कविता उपस्थितांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कागद बाजूला ठेवून वाचावी आणि शक्यतो कविता पाठ करावी जेणे करुन ती थेट रसिकांपर्यंत पोहोचत असते असा सल्ला डॉ. शेजवलकर यांनी उपस्थित कवींना दिला. यावेळी त्यांनी आपण कसे आहोत हे सांगणारी ‘आम्ही’ तर दुसरी रुपकात्मक कविता सादर केली. उपस्थितांमधून त्यांच्या कवितांना वाहवाची दाद मिळत होती. डॉ. सुधीर मोंडकर यांनी कार्यक्रमाच्या निवेदनाची धूरा सांभाळत अत्रेंच्या काही आठवणी उलगडल्या. तसेच, त्यांनी आपली ‘लिलाव’ ही कविता सादर केली. यावेळी ठाणे, मुलुंड, घाटकोपर, अंबरनाथ, टिटवाळा यांठिकाणांहून आलेल्या कवींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.