मानवी साखळीद्वारे कारवाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:04 AM2019-09-26T00:04:55+5:302019-09-26T00:05:17+5:30
कल्याणमध्येही राष्ट्रवादीचे आंदोलन; गुन्हा मागे न घेतल्यास ‘जेल भरो’
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याणमध्ये पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण तहसील कार्यालयापर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती. सूडबुद्धीने दाखल केलेला ईडीचा गुन्हा मागे न घेतल्यास बेमुदत उपोषण आणि जेल भरो आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीतर्फे देण्यात आला.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आकसापोटी भाजप सरकारने शरद पवारांविरोधात ईडीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्वच स्तरावर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. लोकशाही नेस्तनाबूत करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. सर्वाेच्च न्यायालयातील न्यायाधीशांनाही मैदानात उतरत सरकारचा निषेध करावा लागला आहे. राज्यघटना बाजूला ठेवून हुकूमशाही लादण्याचे काम भाजप सरकार करत असून निवडणुकीत विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत एक प्रकारे दबावतंत्र अवलंबण्याचे सध्या सुरू असल्याचा आरोप राष्टÑवादीने केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ईडी कारवाईप्रकरणी सरकारचा निषेध म्हणून शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन दिले. आंदोलनात पक्षाचे प्रदेश महासचिव पारसनाथ तिवारी, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, वल्ली राजन, अॅड. प्रल्हाद भिल्लारे, जव्वाद डोन, जे.सी. कटारिया, समीर वानखेडे, संदीप देसाई, प्रवीण मुसळे, श्याम आवारे, रामदास पाटील, रेखा सोनवणे, विनया पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.