फेरीवाल्यांची धडक, प्रशासनाचा व्यक्त केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:16 AM2019-01-10T05:16:46+5:302019-01-10T05:17:06+5:30
भार्इंदर पालिका : प्रशासनाचा व्यक्त केला निषेध
भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांनी सीटू या संघटनेच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयावर बुधवारी मोर्चा काढला.
मोदी सरकारच्या कामगार व फेरीवालाविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सरकारने फेरीवाल्यांच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही, असे मोर्चाचे नेतृत्व करणारे व जनवादी हॉकर्स सभेचे अध्यक्ष अॅड. किशोर सामंत यांनी सांगितले. हा प्रकार मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास सुरू असून फेरीवाला कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.
पालिका सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसून केवळ दिखाऊपणासाठी शहर फेरीवाला समिती स्थापन करून तिचे नियंत्रण मात्र सत्ताधाऱ्यांच्याच हातात दिले आहे. या समितीला कोणत्याही धोरणात्मक निर्णयासाठी विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई केली जाते.
फेरीवाल्यांच्या मालाची नासाडी करून त्यांचे आर्थिक नुकसान केले जाते. फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येला शहरातील राजकारणी तसेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारीच जबाबदार असून त्यांनी अधिकृत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी केली. फेरीवाल्यांकडून कंत्राटदार अव्वाच्या सव्वा बाजार फी वसूल करतात. त्यांना रोखण्याची ताकद प्रशासनामध्ये नाही. कारण, स्वत:च भ्रष्टाचारी असल्याने कारवाई कशी व कोणावर करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकल्याची टीका त्यांनी केली.
उपायुक्त दीपक पुजारी यांच्यासोबत अॅड. सामंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची चर्चा झाली. उपायुक्तांनी लवकरच आयुक्तांसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मोर्चात प्रभाकर शेट्टी, वीरेंद्र गुप्ता, राजेंद्र जाधव, भरत वानखेडे, रामबदन गुप्ता, गणेश पवार आदींचा सहभाग होता.
भूखंड ताब्यात घेतलेले नाही
बाजारासाठी आरक्षित असलेले भूखंड अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत. या भूखंडांव्यतिरिक्त पालिकेने कमी वर्दळीच्या ठिकाणी बाजाराच्या वास्तू बांधल्या. त्यामुळे त्या वास्तूंत फेरीवाले व्यवसायासाठी जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामदेव पार्क परिसरात नवीन बाजार सुरू केले. त्यात फेरीवाले बसतच नसून ते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. त्यामुळे पालिकेने अतिघाई करून बांधलेले बाजार निरर्थक ठरल्याचा दावा त्यांनी केला.
च्पारंपारिक रविवारचा आठवडा बाजार हप्ते वसुलीच्या नावाखाली बंद पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेने फेरीवाल्यांवर एकतर्फी कारवाई न करता त्यांचे सर्वेक्षण करावे.
च्या सरकारने या वर्गाच्या भल्यासाठी कोणताही चांगला निर्णय घेतला नाही. त्यांना देशोधडीला लावण्यासाठी बड्या उद्योगपतींच्या हातात देशाची अर्थव्यवस्था सोपविली आहे.