कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्त क्षेत्रात मनाई आदेश लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:41 AM2021-03-20T04:41:00+5:302021-03-20T04:41:00+5:30
ठाणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश ...
ठाणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केला आहे. हा मनाई आदेश ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे ठाणे पोलिसांनी म्हटले आहे.
या आदेशानुसार सर्व राजकीय, सामाजिक संघटनांच्या आंदोलनांना पुढील काळात बंदी राहणार आहे.
होळी, धूलिवंदनसारखे सण तसेच शब्बे बारातसारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांना एकत्र येण्याला बंदी राहणार आहे. ठाणे आयुक्तालयातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी तलवारी किंवा बंदुका अशा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्याला बंदी आहे.
कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थाची वाहतूकही करता येणार नाही. सार्वजनिक रीतीने घोषणा देणे, गाणी म्हणणे आणि वाद्य वाजविण्याबरोबर प्रतीकात्मक प्रेताचे किंवा नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन अथवा दहन करणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रतिघोषणा देणे आदी कृत्यांना मनाई असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. पोलीस तसेच कोणत्याही सरकारी कामासाठी हा आदेश लागू राहणार नाही. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही फणसळकर यांनी म्हटले आहे.
--------------------------