ठाण्यात मनाई आदेश: अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याची परवानगी
By जितेंद्र कालेकर | Published: June 1, 2020 09:59 PM2020-06-01T21:59:36+5:302020-06-01T22:04:26+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. मात्र, ठाणे जिल्हयात मनाई आदेश लागू करण्यात आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याला बंदी करण्यात आली आहे. याशिवाय, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई पास शिवाय परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाने येत्या ८ जून पासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणली आहे. तसेच १ जूनपासून परराज्यात आणि आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभर संचारबंदीतही शिथिलता करुन रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच सद्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशाने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी शिथिल केलेली नाही. मात्र, अत्यावश्यक कामांसाठी किराणा, दूध, वैद्यकीय तसेच या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरु होणार असून ती सम विषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरु राहणार आहेत. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम आदींना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
याशिवाय, खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बस वाहतूकीस मनाई राहणार आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत.
अर्थात ३ जून पासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलींगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सी चालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चार चाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक अशी परवानगी देण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
* अंत्यविधीसाठी कमाल २० तर लग्न समारंभाला ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. किराणा सामान, दुध, फळे, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यासाठी परवानगी आहे.
* बँक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, टेलिकॉम, टपाल, केबल आणि रुग्णालय, पेट्रोलपंप आदी कर्मचाऱ्यांनाही यातून वगळण्यात आले आहे.
‘‘ केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जून नंतर सम विषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरु करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही ई पास शिवाय परनवानगी दिलेली नाही.’’
बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय