राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Published: March 15, 2017 02:28 AM2017-03-15T02:28:45+5:302017-03-15T02:28:45+5:30
ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि
डोंबिवली: ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि हेच आमचे वैशिष्ट्य आहे. पण आम्ही षंढ आहोत, असा याचा अर्थ नव्हे, असा इशारा देत ब्राह्मण महासंघाने मंगळवारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा निषेध केला. तसे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
निधर्मियांचा नाश करणारे प्रभू परशुराम हे आमचे दैवत आहे, तर बाजीराव पेशवे आमचा पराक्रम. ज्या काळात नागरिक इंग्रजांच्या समोर उभे रहायला घाबरायचे त्यावेळी त्याच इंग्रजांना ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का?’ ह्या एका प्रश्नानेच त्यांना दणाणून सोडणारे लोकमान्य टिळक, काळ्यापाण्याची असह्य शिक्षा भोगून ही भारतमातेची गुलामगिरीतून सुटका व्हावी ह्यासाठी अहोरात्र झटणारे व झगडणारे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे आम्ही वंशज आहोत हे आमचा देष करणाऱ्यांनी विसरू नये. जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोवर ठीक, अन्यथा नि:क्षत्रीय करणारे आम्हीच आहोत. अटकेपार भगवा फडकवणारे आम्हीच आणि खिंड लढवणारेही आम्हीच आहोत. विनाकारण आमच्या वाटेला जाल, तर तुमच्या अधोगतीस आम्हीच कारणीभूत ठरू, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)