प्रकल्पग्रस्तांनी रोखला फ्री वे
By admin | Published: June 30, 2015 01:26 AM2015-06-30T01:26:31+5:302015-06-30T01:26:31+5:30
ईस्टर्न फ्री वे’साठी (पूर्व मुक्त मार्ग) एमएमआरडीएने पाच वर्षांपूर्वी झोपड्या तोडण्यात आलेल्या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही.
मुंबई : ‘ईस्टर्न फ्री वे’साठी (पूर्व मुक्त मार्ग) एमएमआरडीएने पाच वर्षांपूर्वी झोपड्या तोडण्यात आलेल्या झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसनासाठी सरकारदरबारी खेटे घालणाऱ्या या झोपडीधारकांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसून एमएमआरडीएचे लक्ष आपल्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पबाधितांनी सोमवारी फ्री वेवर रास्ता रोको आंदोलन छेडले.
फ्री वे प्रकल्पाची तयारी २००७पासून सुरू झाली. या प्रकल्पात सुमारे पाच हजार झोपड्या बाधित होणार होत्या. या बाधितांचे पुनर्वसन पांजरापोळ, मानखुर्द, लल्लूभाई कम्पाउंड आणि गोवंडीत करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले होते. काही झोपड्या प्रकल्पाच्या सुरुवातीला, काही मध्यावर तर काही अंतिम टप्प्यात तोडण्यात आल्या. त्यातल्या काही झोपडीधारकांचे पुनर्वसन ठरल्याप्रमाणे झालेही. मात्र उर्वरित झोपडीधारकांना अपात्र ठरवून एमएमआरडीएने हात झटकले. पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत वणवण भटकणाऱ्या या झोपडीधारकांनी सोमवारी फ्री वे अडवला. त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक तुंबली. गोवंडी, आरसीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर पोलिसांनी समजूत काढून झोपडीधारकांना तेथून हटवत रस्ता मोकळा केला. (प्रतिनिधी)