नियोजनशून्य मनपा प्रशासनामुळे रखडले प्रकल्प, रवींद्र चव्हाण यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:37 AM2020-12-10T02:37:01+5:302020-12-10T02:37:01+5:30
Dombivali News : डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत.
डाेंबिवली : शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कोपर, ठाकुर्ली व माणकोली उड्डाणपूल आणि रिंगरोड प्रकल्प लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पांसाठी युती सरकारने भरघोस निधी व सर्व मंजुऱ्या दिल्या आहेत. मात्र, तरीही प्रकल्प रखडले आहेत. त्याला केडीएमसी प्रशासनातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार व अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा ठेवणारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तितकेच जबाबदार आहेत, अशी टीका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली.
डोंबिवली पूर्वेतील सूतिकागृह, पाटकर प्लाझामधील पार्किंग, प्रभाग कार्यालयाचे नूतनीकरण व तेथील वाहनतळ, कोपर उड्डाणपूल, आयरे येथील ड्रेनेजचे पम्पिंग स्टेशन, ठाकुर्ली उड्डाणपूल, पश्चिमेतील बावनचाळ येथे पथदिव्यांची गरज, मच्छी मार्केट, महात्मा फुले रस्त्याचे काँक्रिटीकरण व मोठागाव-माणकोली उड्डाणपूल या सर्व अर्धवट विकासकामांची चव्हाण यांनी बुधवारी पाहणी केली.
त्यानंतर चव्हाण म्हणाले, केडीएमसीचा कारभार सध्या प्रशासक म्हणून आयुक्तांच्या हाती आहे. आता त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावावे. आता तर कोणताही राजकीय दबाव असण्याचा प्रश्न येत नाही? युतीच्या काळात मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सूर्यवंशी तेथे जिल्हाधिकारी होते. आम्ही दोघांनी तेथे विकासकामे केली. केडीएमसीतही तशी कामे होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्या पद्धतीने काम होत नाही. आयुक्त हे खूप सकारात्मक आहेत, पण त्यांच्या हाताखालचे अधिकारी हे अकार्यक्षम असल्याची टीका त्यांनी केली.