बंदींच्या कला कौशल्याला प्रोत्साहन द्या; जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचं आवाहन
By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 20, 2022 05:13 PM2022-10-20T17:13:20+5:302022-10-20T17:13:46+5:30
ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.
ठाणे: बंदीवानांच्या अंगभूत कलागुण, कौशल्य तसेच त्यांच्या आवडीनिवडी जोपासत त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कारागृह निर्मित वस्तू विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरीकांनी प्रोत्साहन दिल्यास भविष्यात शिक्षा संपवून परतल्यावर एकप्रकारे त्यांच्या पुर्नवसनाला मदत होईल. त्यामुळे त्यांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्या असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात दीपावली सणानिमित्त बंदींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री सुरू असून या अनोख्या कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी जिल्हाधिकारी शिनगारे आणि कारागृह उपमहासंचालक योगेश देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक भाईदास ढोले व तुरुंगाधिकारी उपस्थित होते. ठाणे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कौशल्यवान हातांनी बनविलेल्या विविध गृहपयोगी वस्तू दिवाळीनिमित्त ठाणे कारागृहाबाहेरच्या विक्री केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.
उद्घाटनप्रसंगी शिनगारे म्हणाले की, कुणीही जन्मतः गुन्हेगार नसतो. एखादी परिस्थिती अथवा अपप्रवृत्ती त्याला गुन्हेगार बनवते. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अनेक बंदिवान शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या अंगभूत कलाकौशल्याला नागरीकांनी प्रोत्साहन द्यावे. कारागृह उपसंचालक देसाई यांनीही आपल्या कारकिर्दीत सुरु झालेल्या या उपक्रमाची स्तुती केली.
ठाणे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांद्वारे अनेक गृहपोयोगी वस्तूंच्या निर्मितीचा उदयोग गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यात शोपीस वस्तू, कपडे, बेकरी उत्पादन, फर्निचर वस्तू, गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू आहेत. तसेच, दिवाळी सणासाठी खाद्यपदार्थ विशेष करुन दिवाळीचा फराळ, गृहपयोगी वस्तू, लाकडी खुर्च्या, चौरंग, देव्हारा, विविध प्रकारांच्या खुर्च्या, स्टँड, टॉवेल, शर्ट, लेडीज पर्स अशा विविध वस्तूचा समावेश आहे. या वस्तूंची विक्री व्हावी यासाठी ठाणे कारागृह प्रशासनाने हे वस्तू प्रदर्शन ठेवले आहे. कोर्ट नाक्यानजीक असलेल्या प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोरील ठाणे कारागृहात दिवाळी संपेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी उपलब्ध आहे.