मीरा भाईंदर पालिकेच्या २१ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By धीरज परब | Published: December 24, 2022 01:40 PM2022-12-24T13:40:22+5:302022-12-24T13:40:32+5:30
महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण २५ टक्के होते.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आस्थापने वरील चतुर्थ श्रेणीतील २१ कर्मचाऱ्यांना लीपीक टंकलेखक पदावर पदोन्नती मिळाल्याने अनेकवर्षां पासून पदोन्नतीच्या आहेत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
महानगरपालिकेच्या आकृतीबंध व सेवाशर्ती नियमात पदोन्नतीने लिपीक पद भरण्याचे प्रमाण २५ टक्के होते. त्यामुळे मोठ्या संख्येने चतुर्थ श्रेणीतील पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता . या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शासना कडे पत्रव्यवहार चालवला होता . शासनाने देखील पदोन्नतीने पदे भरण्याचे प्रमाण २५ टक्के ऐवजी ४० टक्के इतके केले .
शासनाची मंजुरी मिळाल्या नंतर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी पदवी परीक्षा उत्तीर्ण , एमएस सीआयटी परीक्षा तसेच मराठी ३० व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र सादर करण्यास ७ दिवसांची मुदत दिली होती .
मजूर , सफाई कामगार , शिपाई , हेडमाळी , रखवालदार , मजूर , पंचमदतनीस आदी पदांवर असलेल्या २१ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीचे पत्र आयुक्त ढोले यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी [पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त ढोले व उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांचे आभार मानले . शहरातील नागरिकांची कामे वेळेत व तत्परतेने करा असे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.