हिंदू जागृतीच्या गणेशोत्सवात सजावटीतून संस्कृतचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:23 AM2019-09-06T00:23:21+5:302019-09-06T00:23:30+5:30
होतोय भाषेचा जागर : भक्तांची देखावा पाहण्यास गर्दी
ठाणे : सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेविषयी जनजागृती करणारी सजावट हिंदू जागृती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने साकारली आहे. यात संस्कृत भाषेचा उगम झाल्यापासून तिचा ºहास कसा होत चालला आहे, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. ‘संस्कृत... वारसा संस्कृतीचा’ हा मंडळाचा यंदाचा विषय आहे.
१९९१ साली काही समविचारी तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम सुरू करण्याचे ठरविले. एखादा उपक्रम सुरू करताना धार्मिक आणि सामाजिक विचारांचा मेळ घडवून आणावा या उद्देशाने या मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ‘काळाची गरज हिंदू जागृती भक्तीतून करूया शक्तीची निमिर्ती’ हे ब्रीद गाठिशी घेऊन प्रथम गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाने नेहमीच या उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक विषय हाताळले आहेत.
यंदाही संस्कृत भाषेविषयी प्रचार आणि प्रसार त्यांनी केला आहे. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ही सजावट साकारली आहे. महिनाभर मंडळाचे कार्यकर्ते ती साकारण्यात गुंतले होते. संस्कृत या विषयाकडे स्कोअरिंग विषय म्हणून पाहिले जाते.
एकदा शिक्षण घेऊन झाले की, त्या भाषेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जाते. या भाषेचा ºहास होत असून इंग्रजी भाषेचे आक्रमण कसे झाले आहे. हे या मंडळाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दृकश्राव्यच्या माध्यमातून हा देखावा दाखविला जात असल्याने तो जास्त आकर्षित ठरत आहे. तो पाहण्यासाठी ठाणेकरांची गर्दी होत आहे. संस्कृती ही भारतीय भाषा असली तरी पाश्चिमात्त्यांना तिचे जास्त आकर्षण राहिले आहे, त्यावर ते संशोधनही करीत आहेत आणि आपण फक्त इंग्रजी भाषेच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे संस्कृत भाषेची नुसती प्रशंसा करून तिचा विकास होणार नाही तर दैनंदिन जीवनात तिचा वापर करावा, असा संदेश मंडळाने गणेशभक्तांना दिला आहे.