दिव्यातून फोडणार प्रचाराचा नारळ
By admin | Published: February 15, 2017 04:39 AM2017-02-15T04:39:23+5:302017-02-15T04:39:23+5:30
ठाण्यापेक्षा दिव्यात अधिक हजेरी लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रचाराची सुरूवातही त्याच भागातून करणार असल्याने
ठाणे : ठाण्यापेक्षा दिव्यात अधिक हजेरी लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रचाराची सुरूवातही त्याच भागातून करणार असल्याने दिव्यातील प्रश्नांवर ते कोणती भूमिका घेतात याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी ठाण्यात विकासकामे केल्याबद्दल आयुक्तांनी धमकी आल्याची तक्रार केल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गौप्यस्फोटावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.
दिव्यातील नगरसेवकांची संख्या ११ वर गेल्याने यंदा प्रचारात राजकीय पक्षांसाठी दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. दिवा महोत्सवाला हजेरी लावून आणि वेगवेगळ््या प्रचार कार्यालयांचे उद््घाटन करून राज यांनी यापूर्वीच तेथे हजेरी लावली होती. पण त्यावेळी त्यांनी भाष्य करणे टाळले होते. पण पक्षाचे सरचिटणीस राजू पाटील यांना त्या भागावर लक्ष केंद्रित करण्यास सुचवले होते. त्यानंतर दिवा महोत्सवात कलावंतांना घेऊन आलेल्या अभिजित पानसे यांनी डम्पिंगजवळ झोपडीत राहून या प्रश्नाकडे मनसेचे लक्ष असल्याचे जाहीर केले. त्याच भागात बुधवारी राज यांची पहिली सभा होत असल्याने डम्पिंग, ठाण्यातील विकासकामे आणि दिव्याकडे झालेले दुर्लक्ष हे मुद्दे स्वाभाविकपणे प्रचारात येण्याची शक्यता आहे. त्याखेरीज माझ्या हाती सत्ता द्या, मी नाशिकसारखा दिव्याचा विकास करून दाखवतो, हा मुद्दाही राज प्रचारात मांडतील, असे मनसैनिकांचे म्हणणे आहे. नाशिक पॅटर्न पाहण्यासाठी मनसैनिकांच्या तुकड्या यापूर्वीच तेथे गेल्या होत्या. त्यामुळे त्या कामाची ठाण्याशी आवर्जून तुलना होईल, हे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या सभेबद्दल दिवा परिसरात उत्सुकता असल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.
ठाण्यातील सेना-भाजपाची सत्ता, त्यातील भ्रष्टाचार, टीएमटीची अवस्था, विकासकामांना सहा महिन्यात मिळालेली गती आणि त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांना आलेली धमकी- त्याबद्दल त्यांनी गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली तक्रार हे मुद्दे राज यांच्या भाषणात यावे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी तशी माहिती पुरवल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)