कोपरी पोलिसांच्या तत्परतेमुळे खाडीत अडकलेल्या तरुणाचे प्राण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:46 PM2021-10-25T21:46:49+5:302021-10-25T21:47:17+5:30
कोपरीतील मीठबंदर भागात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तत्काळ धाव घेत खाडीतील झुडूपामध्ये अर्धा किलोमीटर आत जाऊन तुलसी याला सुखरूप बाहेर काढले.
ठाणे- कोपरी परिसरातील खाडीच्या गाळात अडकलेल्या एका फिरस्त्याचे प्राण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे सोमवारी वाचले. तुलसी प्रसाद (३५, रा. कोपरी) असे या तरुणाचे नाव आहे. काही अज्ञात लोक मागावर असल्याने आपण खाडीच्या झुडपात गेलो आणि अडकलो, असे त्याने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सांगिते आहे.
कोपरीतील मीठबंदर भागात २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास खाडीमध्ये एक व्यक्ती अडकल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस हवालदार चंद्रकांत म्हस्के, राजेश आंब्रे आणि पोलीस शिपाई अतिश कोंडीलकर यांनी तत्काळ धाव घेत खाडीतील झुडूपामध्ये अर्धा किलोमीटर आत जाऊन तुलसी याला सुखरूप बाहेर काढले. काही अज्ञात लोक मारण्यासाठी आल्यामुळे खाडीमध्ये उडी मारली. मात्र, त्यानंतर आत चिखलात अडकल्याचे त्याने पोलिसांपाठोपाठ आलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अिग्नशमन दलाच्या पथकांना सांगितले.