ठाणे पोलिसांच्या तत्परतेमुळे सहा तोळ्यांचे दागिने आणि रोकड असलेली बॅग मिळाली परत
By जितेंद्र कालेकर | Published: August 19, 2019 10:30 PM2019-08-19T22:30:49+5:302019-08-19T22:42:19+5:30
सांगली येथून अंबरनाथ येथील नातेवाईकाकडे पूजेच्या निमित्ताने जाणाऱ्या कांबळे कुटूंबियांची दागिने आणि रोकड असलेली बॅगच कल्याण फाटा येथील रिक्षा स्टॅन्डवर विसरली. ही माहिती मिळताच डायघर पोलिसांनी मोठया तत्परतेने ती शोधून संबंधितांना ती सुखरुपरित्या परत केली.
ठाणे : डायघर पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रत्येकी तीन तोळ्यांचे दोन सोन्याचे मंगळसूत्र आणि रोकड असलेली बॅग सांगली येथील राजू कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळाल्याची घटना रविवारी घडली. आपला ऐवज पुन्हा काही तासांनी जसाच्या तसा मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
सांगली येथील रहिवासी राजू कांबळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह अंबरनाथ येथील आपल्या बहिणीच्या नवीन घराच्या गृहप्रवेशपूजेसाठी १८ आॅगस्ट रोजी कल्याणफाटा येथे एका वाहनाने सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आले होते. प्रवासाच्या घाईगडबडीत त्यांच्याकडील प्रत्येकी तीन तोळ्यांची दोन मंगळसूत्रे आणि दोन हजार रुपयांची रोकड असलेली बॅग ते कल्याणफाटा येथील रिक्षास्टॅण्डवर विसरले. अंबरनाथ येथील बहिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. या कुटुंबातील दीपाली आगवणे यांनी तत्काळ शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क करून ही बॅग कल्याणफाटा येथे विसरल्याची माहिती दिली. जाधव यांनी याची गांभीर्याने दखल घेत बीट क्रमांक एकचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण आंधळे आणि राजेंद्र सोनवणे यांना ही बॅग शोधण्यासाठी सूचना केल्या. या दोन्ही पोलीस शिपायांनी कल्याणफाटा चौक याठिकाणी जाऊन बॅगेचा शोध घेतला. तेव्हा त्यांना एक काळ्या रंगाची बॅग मिळाली. त्यानुसार, राजू कांबळे यांच्याशी शीळ-डायघर पोलिसांनी संपर्क करून खातरजमा करून त्यांच्या ताब्यात ही बॅग दिली. बॅगेमध्ये सहा तोळ्यांची दोन मंगळसूत्रे आणि दोन हजारांची रोकड तसेच कपडे असा संपूर्ण ऐवज अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.