चार वर्षांपूर्वी तोडलेल्या इमारतीला मालमत्ताकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:18 AM2019-12-25T01:18:50+5:302019-12-25T01:19:01+5:30
महापालिकेचा गलथान कारभार : रहिवाशांत संताप, १३ लाखांची बिले पाठवली
ठाणे : इमारत तोडल्यानंतर तब्बल चार वर्षांनी तीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने मालमत्ताकराची बिले पाठविले असल्याचा प्रकार समोर आला आहे. तोडलेल्या या इमारतीत १६ नागरिक राहत होते. या सर्वांना १३ लाखा रुपये मालमत्ताकराची बिले पाठवली आहेत. मात्र, ही इमारत तोडल्यानंतर त्याचवेळी पंचनामा करून कराविषयी का विचारणा केली नाही, चार वर्षांनी मालमत्ताकर पाठवण्याची आठवण महापालिकेला कशी झाली असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला असून रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्तकनगर भागातील इमारत क्र मांक ५४ आणि ५५ या इमारती धोकादायक झाल्यामुळे त्या जमीनदोस्त केल्या होत्या. मात्र, या दोन इमारतींच्या बाजूला असलेली आनंद निवास या इमारतीला या दोन इमारतींचा धोका उद्भवू नये यासाठी ती देखील २०१५ ला तोडली होती. सदरच्या इमारतीमध्ये १६ रहिवाशी राहत होते. इमारतीवर कारवाई केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. मात्र, न्यायालयात या रहिवाशांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांचे बीएसयूपीमध्ये पुनर्वसन केले आहे. २०१५ ते २०१९ पर्यंत ही इमारत तोडून चार वर्षे झाल्यानंतर आता वर्तकनगर प्रभाग समितीच्या मालमत्ताकर विभागाने या १६ रहिवाशांना तब्बल १३ लाखांची मालमत्ताकराची बिले पाठवली. ती भरायची कशी असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
अद्याप पंचनामाही केलेला नाही
च्विशेष म्हणजे वितरण व्यवस्थादेखील सदोष असल्याने नागरिकांना वेळेवर बिले मिळत नसल्याचा आरोपदेखील नागरिकांकडून केला जात आहे. मनसेचे पदाधिकारी संतोष निकम यांनी आॅनलाईन ही बिले काढल्यानंतर ठाणे महापालिकेने ती काढल्याची माहिती या रहिवाशांना मिळाली आहे. यासंदर्भात त्यांनी कर विभागाला पत्र देऊन खुलासादेखील मागवला आहे.
च्मात्र,पालिका प्रशासनाने अद्याप तो केलेला नाही. नियमाप्रमाणे एखादी इमारत तोडल्यानंतर आणि तोडलेल्या इमारतींमधील रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतर करताना किंवा त्यांचे पुनर्वसन करताना आधीच्या इमारतीच्या मालमत्ताकराची थकबाकी किती शिल्लक आहे हे तपासून घेण्याचे काम कर विभागाचे आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत कर विभागाने याचा पंचनामाही केला नाही.