भिवंडी महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली अवघी ९१ कोटी,थकबाकी वसुलीचे प्रमाणही अत्यल्प
By नितीन पंडित | Published: April 13, 2023 05:26 PM2023-04-13T17:26:14+5:302023-04-13T17:26:41+5:30
वर्षभरात चालू वर्षाची ४२ कोटी ७३ लाख ८२ हजार २४३ रुपये वसुली झाली आहे.
भिवंडी: दि.१३-भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने मार्च अखेरीच्या आर्थिक वर्षात अवघ्या ९१ कोटी रुपयांचा मालमत्ता कराची वसुली केली आहे.विशेष म्हणजे वार्षिक कर वसुलीचे उद्दिष्ट १३० कोटी रुपयांचे असताना वसूल झालेल्या रक्कमे मध्ये मागील थकबाकी रक्कमेचा सुद्धा समावेश असल्याने थकबाकी वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट होत आहे.
भिवंडी महानगरपालिकेत मालमत्तांकर वसुलीच्या बाबतीत मागील कित्येक वर्षां पासुनची बोंब आहे.त्यात अनेक मालमत्तांवर दुबार कर आकारणी झाल्याने थकीत मालमत्ता कराची रक्कम वाढत जाऊन ५०६ कोटी ५० लाख ६० हजार ८०९ रुपयांपर्यंत पोहचली तर २०२२-२३ या आर्थिक वर्षाची मागणी १३० कोटी ९२ लाख ३४ हजार ५२३ रुपयांची होती .त्यामुळे भिवंडी पालिकेच्या मालमत्ता कराची एकूण वसुली रक्कम ही ६३७ कोटी ४२ लाख ९५ हजार ३३२ रुपयांवर पोहचली आहे.मालमत्ता कर वसुली साठी किमान चार महिने अभय योजना राबवून ही थकीत मालमत्ता कर भरण्याकडे शहरवासीयांनी पाठ फिरविल्याने पालिका प्रशासन समोर यक्ष प्रश्न उभा आहे.पालिका आयुक्त तथा प्रशासक विजय कुमार म्हसाळ यांनी थकीत मालमत्तांच्या कर वसुलीवर भर देण्याचे सक्त आदेश अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी दिले.परंतु पालिके कडून सोयी सुविधा मिळाव्यात या अपेक्षा ठेवणाऱ्या भिवंडीकर मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरण्याकडे सोयीस्कर पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
वर्षभरात चालू वर्षाची ४२ कोटी ७३ लाख ८२ हजार २४३ रुपये वसुली झाली आहे.म्हणजे सरासरी नुसार ३३.५० टक्के पर्यंत पोहचली.तर थकीत रक्कमे पैकी ४८ कोटी ३ लाख ७६८ रुपये अर्थातच अवघी १० टक्के वसुली झाली आहे.
पालिका प्रशासना कडून मागील वर्षभरात मालमत्ता कर वसुली साठी वेगवेगळ्या स्तरावर कारवाया करण्यात आल्या.त्यामध्ये पाणी पुरवठा खंडित करणे,मालमत्ता जप्ती करणे,लीलाव करणे या मर्गाचा अवलंब केला मात्र मालमत्ता कर वसुली हवी तेवढी झाली नसल्याने महापालिका प्रशासनासमोर कर वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.