मालमत्ताकर वसुलीसाठी लागणार कसोटी; आतापर्यंत २०० कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:13 AM2020-01-01T00:13:08+5:302020-01-01T00:13:15+5:30
तीन महिन्यांत १५० कोटींपेक्षा जास्त वसुलीचे केडीएमसीचे लक्ष्य
- मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने यंदाच्या वर्षी मालमत्ताकर वसुलीचे लक्ष्य ३५० कोटींपेक्षा जास्त ठेवले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत महापालिकेने २०० कोटी १० लाख रुपये वसूल केले आहेत. त्यामुळे उर्वरित १५० कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ताकर वसुली विभागाने थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्याचा धडाका लावला आहे.
मालमत्ताकर वसुली विभागाने ३५० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले असले तरी त्यात वाढ करून मालमत्ताकराची वसुली ४७० कोटी रुपये झाली पाहिजे, असे महापालिकेने म्हटले होते. मात्र, हे लक्ष्य वसुलीच्या दृष्टीने अवास्तव असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ३५० कोटींचे लक्ष्य प्रशासनाकडून गाठले जाऊ शकते. प्रशासनाकडून दावा केला जात आहे की, जवळपास ४०० कोटी रुपये वसुलीचा टप्पा गाठता येऊ शकतो. मात्र, ४७० कोटींचा टप्पा गाठणे कठीण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच वसुली जास्त केली जाईल. मात्र, आतापर्यंत वसूल झालेले २०० कोटी १० लाख रुपये पाहता तीन महिन्यांत आणखी २०० कोटींचा वसुलीचा टप्पा प्रशासनाला गाठायचा आहे.
मालमत्ताकर वसुली विभागाने एप्रिलपासूनच वसुलीस सुरुवात केली होती. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे या कामाला काही अंशी ब्रेक लागला होता. मात्र थकबाकीदारांच्या मागे महापालिकेने नोटिसा पाठविण्याचा धडाका लावला आहे. ओपन लॅण्ड थकबाकीदारांकडून महापालिकेस ३८० कोटी येथे बाकी आहे. त्यामुळे महापालिकेने आतापर्यंत ओपन लॅण्डधारक असलेल्या ६४३ बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत. वाणिज्य वापर करणाऱ्या सहा हजार ६०६ व्यापारी, दुकानचालक, फ्लट व चाळीतील मालमत्ताधारक अशा १६ हजार ९४८ जणांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून चालू मालमत्ता करासह थकबाकीची मागणी केली आहे. फ्लट व चाळवजा घरामालकांकडून ३७ कोटी १२ लाखांची थकबाकी तर, मोबाइल टॉवर कंपन्यांकडून ११२ कोटी वसूल होणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडील वसुलीसाठी निविदा मागवली आहे. २७ गावांतून मालमत्ता करापोटी जवळपास २०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. २७ गावांचा प्रश्न सरकार दरबारी व न्यायालयात प्रलंबित आहे. मालमत्ताकर जास्तीचा आकारला जात असल्याने गावांमधील नागरिक कर भरत नाहीत. त्यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे.
...तर ४९२ कोटींची भर पडू शकते
बिल्डरकडून ओपन लॅण्डपोटी थकीत असलेली ३८० कोटी व मोबाइल टॉवर कंपन्यांकडून अपेक्षित असलेली १२२ कोटींची थकबाकी वसुली झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत ४९२ कोटींची भर पडू शकते.
बिल्डरांना ओपन लॅण्डकराचा दर कमी करून दिल्यावरही ते थकबाकीची रक्कम भरत नाही. ही रक्कम भरण्याप्रकरणी अनेक बिल्डरांनी महापालिकेविरोधात दावे दाखल केले आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने वसुलीत अडथळे येत आहेत.
नोटिसा पाठविलेल्यांच्या विरोधात १ फेब्रुवारीपासून ठोस कारवाई करण्यास महापलिका प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे.
- विनय कुळकर्णी, मालमत्ताकर वसुली विभागाचे प्रमुख
थकबाकीदारांची यादीच प्रसिद्ध
महापालिकेने थकबाकीदारांची यादीच प्रसिद्ध केली आहे. त्यात बड्या थकबाकीदारांची नावे आहेत. ते थकबाकीची रक्कम भरत नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील केल्या जात आहेत. या मालमत्ता लिलावात काढल्या जात आहेत.