मालमत्ता कराची केली बनावट बिले ?
By admin | Published: January 3, 2017 05:32 AM2017-01-03T05:32:43+5:302017-01-03T05:34:33+5:30
भार्इंदरच्या ‘राई शिवनेरी’ येथील सरकारी जागेवरील बेकायदा घरांना बनावट मालमत्ता कराच्या बिलांद्वारे संरक्षण मिळवून देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
भार्इंदर : भार्इंदरच्या ‘राई शिवनेरी’ येथील सरकारी जागेवरील बेकायदा घरांना बनावट मालमत्ता कराच्या बिलांद्वारे संरक्षण मिळवून देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सरकारी जागा बळकावण्यासाठी खोटे पुरावे तयार करण्याच्या या कारवायांमध्ये पालिकेतील कर्मचारी गुंतल्याची शक्यता नाकारता येत नाही.
भार्इंदर पश्चिमेच्या राई येथील ‘शिवनेरी नगर’ हे सरकारी जागेत वसले असून सीआरझेड, कांदळवनांचे हे क्षेत्र आहे. या ठिकाणी आजही महापालिका व स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने सर्रास कांदळवने नष्ट करून बेकायदा झोपड्या व बांधकामे होत आहेत. महसूल विभागाकडून शासकीय जमिनीच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. ‘शिवनेरी नगर’च्या काही भागातील बेकायदा झोपड्या पाडण्याची कारवाई अलीकडेच झाली. उर्वरित बांधकामे तोडायची बाकी असतानाच स्थायी सभापती दालनातील कर्मचारी अशोक टोपले यांच्याकडे दोन वर्षांची मालमत्ता कराची बिले भरण्यासाठी आली. सदर बिले भरण्याचा प्रयत्न केला असता त्याचा तपशील संगणकावर जुळत नव्हता. टोपले यांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांकडे त्याची माहिती घेतली असता ती दोन्ही बिले बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
सन २०१४-१५ व २०१६-१७ अशा दोन आर्थिक वर्षातील ही झेरॉस बिले मीरा-भार्इंदर महापालिकेच्या लोगो व शिक्क्यासह आहेत. भारतीय गहुकार व सोनिया खातून सलामुल्ला अशी दोन नावे एकाच बिलावर असून कर निर्धारक म्हणून डॉ. दीपक सावंत यांचे नांव व सही आहे. विशेष म्हणजे सावंत यांची दोन वर्षांपूर्वीच बदली झालेली आहे. बिलातील मालमत्ता क्रमांक बनावट आहे.
या प्रकरणी करनिर्धारक व संकलक तथा सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)