ऐन कोरोनाकाळात मालमत्ता कराची ७१ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:39+5:302021-04-02T04:42:39+5:30
उल्हासनगर : कोरोनाकाळात मालमत्ता करवसुली ठप्प असतानाही विभागाने गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याची माहिती विभागाचे उपायुक्त मदन ...
उल्हासनगर : कोरोनाकाळात मालमत्ता करवसुली ठप्प असतानाही विभागाने गेल्या काही महिन्यांत ७१ कोटींची वसुली केल्याची माहिती विभागाचे उपायुक्त मदन सोंडे व कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट नसताना कर विभागाची वसुली ७७ कोटी झाल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर महापालिकेचे मुख्य उत्पन्न स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र कोरोनामुळे मालमत्ता कर बिले उशिरा जाऊन सप्टेंबर महिन्यापर्यंत विभागाची वसुली ठप्प होती. मालमत्ता करवसुलीबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले होते. अशावेळी कर विभागाची वसुली होण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू केली. सोंडे, करमचंदानी यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने ७१ कोटींची करवसुली केली आहे.
महापालिकेने कोरोनाकाळात सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता करवसुलीबाबत सक्ती न करता ३१ मार्चपर्यंत ७१ कोटींची वसुली केली. गेल्यावर्षी वर्षभरात एकूण ७७ कोटींची वसुली झाली होती. विभागाला १०० कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र कोरोनाकाळात ते शक्य नव्हते. येत्या वर्षात विक्रमी मालमत्ता कर वसुली करण्याचा निर्धार करमचंदानी व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मालमत्ता कर विभागात ५४२ कोटींची थकबाकी दाखवत असले तरी २० हजार मालमत्तेची नोंद दुबार किंवा अस्तित्वात नसलेल्या मालमत्ता आहेत.