नवीन पत्रीपुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:00 AM2018-11-03T00:00:08+5:302018-11-03T00:01:18+5:30
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर; मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकचेही नियोजन नाही
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा पत्रीपूल पाडण्याचे काम महिनाभरपासून खोळंबले आहे. नव्या पुलासाठी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे, अशी माहिती रेल्वेच्या अभियंत्यांनी दिली. पूर्ण पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेला विशेष ब्लॉक घ्यावे लागणार असून, त्याचेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे एमएसआरडीसी समोरही पेच असून काम सुरू करायचे असले तरी रेल्वेच्या तांत्रिक बाबींची पूर्तता होत नसल्याचे स्पष्ट झाले.
जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामास सप्टेंबरपासून सुरुवात झाली. त्यावेळी केवळ पुलावरील डांबर उखडण्यात आले. मात्र, त्यानंतर पूल पाडण्याचे काम महिनाभरापासून खोळंबले आहे. त्यासाठी विशेष मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. उपनगरी आणि लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकामध्ये हे विशेष ब्लॉक कसे, कधी घ्यायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्याचेही नियोजन होत नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांसमोरही पेच निर्माण झाला आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडेही नव्या पुलाची परवानगी प्रलंबित आहे.
दरम्यान, जुन्या पुलावरून जाणारी वाहतूक शेजारील अरुंद पुलावरून वळवण्यात आली आहे. तेथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने कल्याण-डोंबिवलीकर त्रस्त आहेत. गोविंदवाडी बायपास, तसेच ९० फुटी रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांना दीड तास खोळंबून राहावे लागत आहेत. शिवाजी चौक ते पत्रीपूल, असा दुतर्फा प्रवास नकोसा झाला आहे. इंधन व वेळेचा अपव्यय, यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. त्यातच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग असल्याने समस्येत आणखी वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढणारी कोंडी, बंद असलेल्या पुलावरून होणारी पादचाºयांची ये-जा, यामुळे तेथे अपघाताची शक्यता आहे.
मनसेचे शनिवारी ठिय्या आंदोलन
पत्रीपुलानजीच्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या वतीने मनसे शनिवारी पत्रीपुलानजीक ठिय्या आंदोलन करणार आहे. पुलाच्या दुतर्फा ठिय्या मांडून पूल पाडणार कधी, नवा कधी बांधणार, तोपर्यंत नागरिकांनी काय करायचे असा सवाल करत हे आंदोलन होणारच, असे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले. नागरिकांनी किती काळ आणि का घुसमट सहन करायची असे ते म्हणाले. आपापल्या परीने सहभागी होण्यासाठी वाहनचालकांनी काळे झेंडे, काळ्या रिबिन वाहनांवर बांधाव्यात आणि निषेध व्यक्त करावा, असेही आवाहन कदम यांनी केले आहे.