रेल्वेपुलांखाली संरक्षक जाळीचा प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:21 AM2019-12-20T00:21:56+5:302019-12-20T00:22:10+5:30

अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजनाच नाही : विविध यंत्रणांचे अपयश

The proposal of a protective mesh under the railway bridges into the dust | रेल्वेपुलांखाली संरक्षक जाळीचा प्रस्ताव धूळखात

रेल्वेपुलांखाली संरक्षक जाळीचा प्रस्ताव धूळखात

Next

अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या पत्नीच्या नावे असलेली मोटार बुधवारी रात्री निळजे येथील उड्डाणपुलावरून थेट पनवेल-वसई मार्गावरील रेल्वेच्या रुळांवर कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी एमएमआरडीए, एमएसआरडीसी व रेल्वे प्रशासन असे अपघात घडल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब पुन्हा पुढे आली आहे. २०१२ मध्ये ठाणे-मुंब्रा या स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे खाडीपुलांखाली संरक्षक जाळी लावण्याचाही प्रस्ताव होता. परंतु, त्याची अंमलबजावणी गेल्या सात वर्षांमध्ये झालेली नसून, तो प्रस्ताव धूळखात पडला आहे.


माजी खासदार आनंद परांजपे व संजीव नाईक, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथे होणारे अपघात रोखण्यासाठी पाहणी केली होती. खाडीपुलावर लोकलमधून पडून एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास तो प्रवासी थेट खाडीत पडतो आणि त्याचा मृतदेह शोधताना तपासयंत्रणेला त्रास होतो. त्यासाठी तेथे संरक्षक जाळी लावल्यास अपघात झाल्यास प्रवाशाला होणाऱ्या जखमेची तीव्रता कमी होईल आणि त्यासोबतच त्याचा जीवही वाचेल. अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये त्यास उपचार मिळतील, असा उद्देश पाहणीदौºयावेळी व्यक्त करण्यात आला होता. परांजपे, नाईक यांनी ती सूचनादेखील रेल्वेकडे केली होती.


रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलांवरही रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. मुंब्रा बायपास, पत्रीपूल, काटई पूल, देसाई खाडीपूल येथील पुलांवर अपघात झाल्यास ते रोखण्यासाठी अशा प्रकारे कुठेही संरक्षक जाळी नाही.
त्यामुळे एखाद्या वाहनचालकाचा अपघात झाल्यास तो थेट रेल्वेरुळांवरच जाऊन पडतो. त्यामुळे मोठी दुघर्टना घडू शकते, हे बुधवार रात्रीच्या निळजे-काटई येथील घटनेवरून समोर आले. त्यामुळे या संरक्षक उपाययोजनांकडे एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.


रेल्वेशी संबंधित जाणकारांनी सांगितले की, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार केव्हीचा वीजप्रवाह जात असतो, अशा ठिकाणी संरक्षक जाळी नाही तर अन्य अत्याधुनिक पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पण खाडीपुलांखाली तर असा अडथळा नाही, तेथे तातडीने चांगल्या दर्जाची जाळी लावणे गरजेचे आहे.
या जाळ्यांमुळे अपघातांची तीव्रता कमी होईलच, पण त्यासोबत खाडीमध्ये पिशव्यांमधून टाकल्या जाणाºया निर्माल्यामुळे होणारे प्रदूषणही कमी होईल.


रेल्वेने संरक्षक जाळी लावलेली नाही, ही शोकांतिका आहे. उड्डाणपुलांखालीही अशा प्रकारे अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. ते २०१४ पासून झालेले नाहीत. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासनाने या गंभीर मुद्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करायला हवी. रेल्वेमार्गावर असलेले खाडीपूल, मुंब्रा बायपास ते कल्याण शीळ आणि भिवंडी मार्ग हे अपघातांचे क्षेत्र आहेत. हे महामार्ग असले तरीही या मार्गांच्या आजूबाजूला वस्ती आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक आहे, त्याला आळा घालायलाच हवा
- आनंद परांजपे, माजी खासदार

अपघातस्थळी संरक्षक जाळी लावणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता जास्त आहे. त्यासोबतच अशा ठिकाणी सीसी कॅमेरे बसवायला हवेत, जेणेकरून घटना घडताच सहप्रवाशांनी सुरक्षा यंत्रणेला कळवावेच, पण रेल्वे प्रशासन, संबंधित यंत्रणेचेही लक्ष लागेल. रेल्वे प्रशासन घाट सेक्शनमध्ये कॅमेरे लावते, तर अशा सुरक्षेच्या ठिकाणी लावणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी निश्चितच पाठपुरावा करणार आहे.
- राजन विचारे,
खासदार, ठाणे

निळजे पुलावर जो अपघात झाला, तो प्रकार भयंकर होता. अपघात खड्डे चुकवण्याच्या नादात संबंधित वाहनचालकाकडून झाला असेलही, परंतु पुलावरून थेट गाडी रुळांमध्ये जाणे हे जास्त धोकादायक आहे. त्या ठिकाणी पुलाच्या बाजूला, खाली संरक्षक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी काळात आवाज उठवणार आहे.
- प्रमोद पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

Web Title: The proposal of a protective mesh under the railway bridges into the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.