सुरक्षा पुलाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

By admin | Published: March 12, 2016 01:58 AM2016-03-12T01:58:20+5:302016-03-12T01:58:20+5:30

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित

The proposal of the safety bridge will be done by Disaster Management | सुरक्षा पुलाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

सुरक्षा पुलाचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे

Next

हितेन नाईक,  पालघर
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील उच्छेली-दांडी, नवापूर, पाम, मुरबे, तारापूर इ. परिसरांतील लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या दृष्टीने दांडी-नवापूर आणि मुरबे खारेकुरण हे दोन पूल उभारणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरने राज्यासह केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविला असून लवकरच या पूल उभारणीबाबत शुभवर्तमान ऐकावयास मिळणार असल्याची माहिती पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर यांनी लोकमतला दिली.
मुरबे व खारेकुरण या दोन गावांमधून वाहणाऱ्या खाडीवर पूल बांधणे अत्यंत गरजेचे असून पूल उभारण्याची मागणी १९५८ पासून येथील स्थानिक जनता करीत असून वेळोवेळी या मागणीचा पाठपुरावा संबंधित लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, अधिकारीवर्ग करीत आहेत. अणुऊर्जा प्रकल्पात एखाद्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पुलांची उपयुक्तता पाहून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ते सर्वेक्षण पूर्ण करून या दोन्ही पुलांचे आराखडे व नकाशे (डिझास्टर एव्याकुशन प्लॅन) यांना मान्यताही देऊन हे प्रकरण देशाचे पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे. या पुलाच्या उभारणीच्या निधीसाठी भक्कम पाठपुराव्याची आवश्यकता असून खासदार, आमदार यांची राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पुलाच्या उभारणीसाठी प्रयत्न करण्याची गळ घातली असून पोटनिवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्याच्या विकासाचे आश्वासन देऊन गेलेले शिंदे या पुलाच्या उभारणीकामी सरकारमध्ये आपले किती वजन खर्ची घालतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ हे १९६९ साली कार्यान्वित झाल्यानंतर सन २०१०-११ मध्ये ३ आणि ४ वाढीव आण्विक रिअ‍ॅक्टर कार्यान्वित झाले.
या दरम्यानच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रकल्प-१ आणि २ ची कालमर्यादा पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्प केंद्रात घातपाताने अथवा मानवी चुकीमुळे आण्विक अपघात घडल्यास परिसरातील २० ते २५ किमी परिसरातील तारापूर, पोफरण, चिंचणी, डहाणू, पाम, कुंभवली, नवापूर, नांदगाव, मुरबे, सातपाटी, माहीम, केळवे इ. शेकडो गावे बाधित होऊन मोठा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास परिसरातील लोकांना संरक्षित ठिकाणी पोहोचवणे गरजेचे ठरणार आहे. परंतु, ४७ वर्षांच्या कालावधीमध्ये दरवर्षी फक्त आपत्कालीन व्यवस्थेचे डेमो सादर करण्यापलीकडे अणुऊर्जा प्रशासन आणि शासन यांना विशेष काहीही उपाययोजना करण्यात यश आल्याचे दिसून येत नाहीत. हे इथून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अपयश म्हणावे लागेल.
> 1सध्या तारापूर ते बोईसरमार्गे अहमदाबाद महामार्गाकडे आणि पालघरकडे जाणाऱ्या रस्त्याव्यतिरिक्त अन्य मार्ग नसून एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी उसळलेल्या गर्दीला रोखणे शक्य होणार नसल्याचे दिसून येत आहे. तारापूर औद्योगिक परिसरात १२०० च्या आसपास कारखाने असून त्या करखान्यात रोजगारासाठी येणारा वर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
2आपत्कालीन परिस्थिती उत्पन्न झाल्यास कमीतकमी जीवितहानी व्हावी, यासाठी उच्छेली दांडी-नवापूर आणि मुरबे-खारेकुरण हे दोन खाडीवरील पूल तत्काळ बांधणे गरजेचे बनले आहे. या पुलांच्या निर्मितीमुळे दांडी-नवापूर-मुरबे-खारेकुरण येथून थेट पालघर, मनोरमार्गे अहमदाबाद महमार्गाला थोड्याच कालावधीत जाता येणार आहे. तर, काहींना माहीम, केळवे, सफाळे येथून तांदूळवाडी पुलावरून वसई-ठाणे, मुंबईच्या दिशेने जाता येणार आहे.3या प्रकल्पामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे पेट्रोल, डिझेल इंधनाची बचतही होणार आहे. तसेच स्थानिक शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांचा उत्पादित माल कमीतकमी वेळेत मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचून त्यांच्या मालाला रास्त भाव मिळणार आहे. यासाठी गरज आहे ती लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या वचनांचे काय झाले हे लवकरच कळेल.

Web Title: The proposal of the safety bridge will be done by Disaster Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.