उल्हासनगरात ३५० बेडचे मध्यवर्ती रुग्णालय व नर्सिंग कॉलेज प्रस्तावित; मेडिकल कॉलेजचीही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:38 PM2022-03-12T14:38:43+5:302022-03-12T14:40:20+5:30
मध्यवर्ती रुग्णालय मागील खुल्या जागेत ३५० बेडचे रुग्णलाय व नर्सिंग कॉलेज प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालय मागील खुल्या जागेत ३५० बेडचे रुग्णलाय व नर्सिंग कॉलेज प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली. तसेच शहरातील जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णलाय, शासकीय महिला प्रस्तुतीगृह रुग्णालय, महापालिकेचे २५० बेडचे नवीन अंटेलिया येथील रुग्णालयसह असे तीन मोठे रुग्णालयामुळे मेडिकल कॉलेजच्या मागणीने जोर पकडला आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, टोकावडे, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ८०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद आहे. तर मध्यवर्ती रुग्णालय रुग्णांच्या वाढत्या संख्येने अपुरे पडत आहे. तसेच रुग्णालयाची इमारत ४० वर्ष जुनी झाल्याने, इमारत पुनर्बांधणीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. रुग्णलाय मागील खुल्या जागेत ३५० बेडचे अद्यावत रुग्णालय व त्या शेजारी नर्सिंग कॉलेज प्रस्तावित आहे. या दोन्ही कामाचा लवकरच मुहूर्त लागेल. असे माहिती रुग्णलायाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांनी दिली.
मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचारीची संख्या अपुरी असल्याने, रुग्णांची हेडसांड होत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळते. नवीन अद्यावत ३५० बेडचे रुग्णालय झाल्यास रुग्णांच्या संख्ये बरोबर शासन डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करणार आहे. तसेच मध्यवर्ती रुग्णालय शेजारी नर्सिंग व मेडिकल कॉलेज झाल्यास मध्यवर्ती रुग्णलाय, शासकीय महिला प्रस्तुतीगृह रुग्णलाय व महापालिकेचे उभे राहिलेले नवीन २५० बेडचे अंटेलिया रुग्णालय यामध्ये शिकाऊ डॉक्टर व नर्स मिळणार आहेत. त्यामुळे रुग्णांचे उपचार चांगले होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.
मध्यवर्ती रुग्णालयाचे पालटले रूपडे
मध्यवर्ती रुग्णालयाचे रंगरंगोटी करण्यात आली असून शस्त्रक्रिया विभाग अद्यावत करण्यात आले. तसेच रुग्णलाय अंतर्गत रस्ते नव्याने बांधण्यात आले असून इमारतीला दोन लिफ़्ट यासह अध्यावत साहित्य आले आहे. नूतनीकरणाने रुग्णालयाचे रुपडे पालटले असून रुग्णलाय मागील खुल्या जागेत ३५० बेडचे रुग्णालय व नसिंग कॉलेज उभे राहिल्यास नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहे.