स्टॅन यांच्या मृत्यूस जबाबदार यंत्रणेवर खटला दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:32+5:302021-07-07T04:50:32+5:30
ठाणे : फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाबाबत ठाण्यातील ख्रिस्ती बांधव आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांचे ...
ठाणे : फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाबाबत ठाण्यातील ख्रिस्ती बांधव आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांचे वय पाहता त्यांच्याशी माणुसकीच्या नात्याने वागायला हवे होते, अशा भावना समाजबांधवांनी व्यक्त केल्या. तसेच, त्यांचा मृत्यू कोणामुळे झाला याचा पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे स्टॅन यांच्या खुनास जबाबदार यंत्रणेवर, खटला दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बहुतेकांच्या मनामध्ये आज प्रश्न आहे की, फादर स्टॅनला कोणी मारले? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आणि त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत होणे आवश्यक आहे. मला वाटते. न्याय, सत्य, बंधुत्वावर आधारित असलेल्या संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या या देशात आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. स्वामींचा मृत्यू व्यर्थ नाही. मला माहीत आहे त्यांच्या मृत्यूने एक नवीन जीवन आणि समाज जन्माला येईल. मी जरी लज्जितपणे डोके टेकवत असलो तरी मला माझ्या सहकारी बंधूचा अभिमान आहे.
- बिशप ऑलविन, प्रमुख, ठाणे डिनरी
------------------------
जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती दोषी नसतो. फादर स्टॅन स्वामी हे ज्येष्ठ नागरिक होते. त्यांचे वय पाहता सरकारने त्यांच्याशी माणुसकी या नात्याने वागायला हवे होते तसेच त्यांना वेळेत उपचार मिळायला हवे होते. या देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे की त्याला चांगले उपचार मिळावेत. परंतु, त्यांना याला पण मुकावे लागले ही खेदाची बाब आहे.
- कॅसबर ऑगस्टिन, माजी अध्यक्ष, बॉम्बे कॅथलिक सभा, ठाणे युनिट
------------------------------
सोमवारचा दिवस हा ख्रिश्चन समाजासाठी काळा दिवस ठरला. फादर स्टॅन स्वामी यांच्याबाबत जे घडले ते अत्यंत वाईट घडले. आम्हाला अतीव दुःख होत आहे. ते शेवटपर्यंत गरिबांसाठी झटत राहिले होते. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर न्याय मिळायला हवा.
- डेव्हिड सोरस, सदस्य, सेंट जॉन चर्च, ठाणे
----------------------
स्टॅन यांच्या खुनास जबाबदार यंत्रणेवर, खटला दाखल करा!
फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी झालेले निधन हा नैसर्गिक मृत्यू नसून व्यवस्थेने त्यांचा केलेला हा निर्घृण खून आहे. या खुनाला जबाबदार जेल प्रशासनाचा निष्काळजीपणा, सरकारी यंत्रणांचा द्वेषपूर्ण तपास आणि एका वयोवृद्ध निरपराध नागरिकाला संविधानातील २१व्या कलमानुसार दिलेला जगण्याचा मूलभूत अधिकार नाकारला जात असतांनाही, न्याय यंत्रणेने त्याकडे केलेला कानाडोळा या बाबी आहेत. पार्किन्सनसारखा दुर्धर आजार व त्यात वर तब्येत प्रचंड खालावलेली असतांनाही स्वामी यांना वेळेवर योग्य उपचार देण्यात कुचराई करण्यात हात असलेल्या सर्व संबंधितांवर, कोठडीत आरोपीचा संगनमताने खून केल्याचा खटला दाखल करावा. तसेच कोरोना संकट लक्षात घेऊन, आरोप सिद्ध न झालेल्या बंदीवानांना त्वरीत जामिनावर सोडावे.
- डॅा. संजय मंगला गोपाळ, राष्ट्रीय समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयक