कचरावेचक मुलांकडून पर्यावरणाचे रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:26+5:302021-07-02T04:27:26+5:30
कल्याण : डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या मुलांनी वृक्षारोपण करीत पर्यावरणाचे संरक्षण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही ...
कल्याण : डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या मुलांनी वृक्षारोपण करीत पर्यावरणाचे संरक्षण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही झाडे दत्तक घेतली असून, त्यांचे संवर्धनही ते करणार आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अनेकांनी वृक्षारोपण केले. झाडे लावली जातात; परंतु त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. कल्याणच्या पाणबुडेनगर येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या कचरावेचक मुलांनी केवळ दिखावा न करता वृक्षारोपण केले. अनुबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मुलांनी आवळा, चिंच, जाम, पेरू, कडुलिंब, लिंबू, सीताफळ आदी प्रकारची झाडे लावली. या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही या मुलांनी घेतली आहे. ते तीन आठवड्यांपासून या झाडांची काळजी घेत आहेत. त्यामुळे झाडे हिरव्यागार पानांनी बहरू लागली आहेत. निसर्गाच्या संरक्षणाचे चांगलेच भान या मुलांमध्ये दिसून येत आहे. या मुलांचा हा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण पूर्णपणे होत नसल्याने डम्पिंग ग्राउंडवर ओला व सुका कचरा असा एकत्रितपणे टाकला जातो. कचरावेचक मुले हा कचरा वेचून त्यांचा उदरनिर्वाह करत असली तरी त्यातूनही ते पर्यावरण संरक्षणाचेच काम करीत आहेत. त्यात त्यांनी वृक्षारोपणासह झाडे वाढविण्याची जबाबदारी घेतल्याने त्यांचा पर्यावरण संरक्षणाचा प्रयत्न द्विगुणित झाला आहे.
-------------------