मीरा भाईंदरच्या शिधावाटप कार्यालयास पत्र्याचे संरक्षण
By धीरज परब | Published: May 3, 2023 07:42 PM2023-05-03T19:42:28+5:302023-05-03T19:42:44+5:30
मेट्रोच्या कामासाठी म्हणून तात्पुरती तोडलेली मीरा भाईंदर शिधावाटप कार्यालयाची भिंत अजूनही प्रशासन व ठेकेदाराला कडून बांधून न मिळाल्याने कार्यालयाचे संरक्षण केवळ पत्र्यांच्या आधारे केले जात आहे.
मीरारोड : मेट्रोच्या कामासाठी म्हणून तात्पुरती तोडलेली मीरा भाईंदर शिधावाटप कार्यालयाची भिंत अजूनही प्रशासन व ठेकेदाराला कडून बांधून न मिळाल्याने कार्यालयाचे संरक्षण केवळ पत्र्यांच्या आधारे केले जात आहे. भाईंदर पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुला खाली राज्य शासनाचे मीरा भाईंदर शिधावाटप कार्यालय आहे. त्या लगत मेट्रोचे काम सुरु असून गर्डर उभारताना मशीन फिरण्यासाठी जागा हवी म्हणून २३ ते २८ मार्च दरम्यान शिधावाटप कार्यालयाची एकाबाजुची भिंत पूर्णपणे तोडण्यात आली. भिंत तोडल्याने त्याठिकाणी पत्रे उभारून तात्पुरती पत्र्यांची भिंत ठेकेदाराने उभारून दिली. कार्यालयाचे प्रवेश द्वार दुसरीकडून देण्यात आले.
कार्यालयाच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा रक्षक ठेवल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात कोणी सुरक्षा रक्षकच दिसत नाहीत. सुरवातीला ठेवले होते. त्यावेळी ठेकेदारा कडून गार्डरचे काम पूर्ण करून १० ते १५ दिवसात कार्यालयाची भिंत ही पूर्वी प्रमाणे बांधून दिली जाईल असे आश्वस्त करण्यात आले होते.
मात्र महिना उलटला तरी कार्यालयाची भिंत अजूनही बांधून मिळालेली नसल्याने कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पत्राच्या शेड मुळे कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होत आहे. शिवाय गैरसोय होत आहे. कार्यालयाचा महत्वाचा दस्तऐवज आणि कार्यालयातील इतर वस्तूची चोरी होण्याची वा आग आदी लागण्याची भीती रेशन अधिकारी राजेंद्र जाधव यांनी बोलून दाखवली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला संबंधित लोक जबाबदार राहतील असे ते म्हणाले.