जेसीबीच्या धक्क्याने मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली; 3 चिमुकल्यांसह सहाजण जखमी

By नितीन पंडित | Published: September 27, 2022 08:57 PM2022-09-27T20:57:20+5:302022-09-27T20:57:52+5:30

भिवंडी मनपाची धोकादायक कारवाईच बनली नागरिकांसाठी धोका.

Protective wall of marriage hall collapsed due to JCB ; Six people including 3 children were injuredb | जेसीबीच्या धक्क्याने मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली; 3 चिमुकल्यांसह सहाजण जखमी

जेसीबीच्या धक्क्याने मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत कोसळली; 3 चिमुकल्यांसह सहाजण जखमी

googlenewsNext

भिवंडी: मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत तोडण्यासाठी गेलेल्या जेसीबीचा धक्का भिंतीस लागल्याने भिंत पलीकडच्या नागरी वस्तीत कोसळल्याची घटना शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात मंगळवारी सायंकाळी घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्या तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध व एक तरुणी, असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

अलीशा (वय ३ वर्ष), नाझिया शेख(वय १७ वर्ष), निजामुद्दीन अन्सारी (वय ६० वर्ष), फैजान (वय ८ वर्ष), जैनाब अजहर खान( वय ४ वर्ष) व एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला, असे या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांची नावे असून आहेत. जखमींना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना ठाणे कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.  सध्या या सहा जणांवर भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात गरीब नवाज हॉल हे खुल्या मैदानातील मंगल कार्यालय होते. या मंगल कार्यालयाची संरक्षक भिंत धोकादायक झाल्याने मनपा प्रशासनाने खासगी कंत्राटदाराकडून भिंत पाडण्याचे काम मंगळवारी सायंकाळी सुरु केले. यावेळी भिंत पलीकडे असलेल्या रहिवासी गल्लीतील रस्त्यावर कोसळली. या रस्त्यावर अलिशा, फैजान व जैनाब ही लहान मुले खेळत होती तर तिघेजण या रस्त्यावरून जात असताना भिंत अंगावर कोसळल्याने हे सहाही जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी जेसीबीची तोडफोड केली व मनपा प्रशासनाच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध केला. मनपा प्रशासनाने ही कारवाई करताना परिसरातील नागरिकांना कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मनपा प्रशासनाने उचलून, या जखमींना आर्थिक साहाय्य करावे, तसेच बेजबाबदारपणे तोडक कारवाई करणाऱ्या मनपा कर्मचारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची करवी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.

दुर्घटनेतील धोकादायक भिंत तोडण्याची कोणतीही सूचना अथवा नोटीस मनपा प्रशासनाने कंत्राटदारास दिली नाही. त्यामुळे ही भिंत तोडण्यासाठी कोण गेला होता, यासंदर्भात चौकशी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ त्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी असून सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून एका इसमास गंभीर दुखापत झाली आहे. मनपाची आपत्कालीन यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून या घटनेची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनपा मुख्यालय उपयुक्त दिपक पूजारी यांनी दिली आहे.

Web Title: Protective wall of marriage hall collapsed due to JCB ; Six people including 3 children were injuredb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.