पाणीचोरी रोखण्यासाठी सुरक्षारक्षक?
By admin | Published: March 22, 2016 02:18 AM2016-03-22T02:18:20+5:302016-03-22T02:18:20+5:30
पाणीचोरीला कायमचा आळा घालण्यासाठी एमआयडीसी मोठ्या जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव डोंबिवलीतील एमआयडीसीकार्यालयाने
मुरलीधर भवार, डोंबिवली
पाणीचोरीला कायमचा आळा घालण्यासाठी एमआयडीसी मोठ्या जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव डोंबिवलीतील एमआयडीसीकार्यालयाने मुंबईतील मुख्य कार्यालयास पाठवला आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
बारवी व आंध्र धरणातून उल्हास नदीपात्रात पाणी सोडले जाते. एमआयडीसी जांभूळ येथे ते पाणी उचलून तेथे जलशुद्धीकरण करते. त्यानंतर, ते एक हजार ७७२ मिलिमीटर व्यासाच्या मोठ्या जलवाहिन्यांतून वाहून नेले जाते. एक जलवाहिनी जांभूळ फॉरेस्ट नाका, अंबरनाथ औद्योगिक वसाहत, खोणी, शीळमार्गे काटईकडे येऊन मिळते. तर, दुसरी जलवाहिनी टाटा पॉवर, पिसवली, गोळवली, दावडी, पिंपळेश्वर, कोळेगाव, काटई, देसाई, शीळमार्गे नवी मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा परिसरात जाते. या जलवाहिनीद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांसह नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
कल्याण-शीळ व अंबरनाथ-शीळ मार्गावरील हॉटेल्स, ढाबे, सर्व्हिस सेंटरवाले सर्रासपणे या जलवाहिन्यांतून बेकायदा नळजोडण्या घेतात. त्याद्वारे पाणीचोरी होते.
पाण्याची वाहनतूट ही १० ते १५ टक्के असली तरी त्यात पाणीचोरीमुळे भर पडते. पाणीचोरी रोखण्यासाठी एमआयडीसीने नोव्हेंबर २०१५ मध्ये ३५० बेकायदा नळजोडण्या तोडल्या होत्या. परंतु, त्या नळजोडण्या पुन्हा जोडण्यात आल्या. नोव्हेंबर ते आजपर्यंत पुन्हा एमआयडीसीने २४० बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई केली. एमआयडीसीचे अधिकारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तात कारवाई करतात. परंतु, अनेकदा बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई बारगळते. त्यामुळे पाणीचोरांवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी जलवाहिनीच्या परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांनी दिली.