कोपरी पुलाच्या निकृष्ट कामाचा टाळ-मृदंग वाजवून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:39+5:302021-06-19T04:26:39+5:30
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर कोपरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पूर्ण होण्यापूर्वी ...
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर कोपरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पूर्ण होण्यापूर्वी त्याला तडे गेल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी ठाणे शहर मनसेने केला होता. त्यानंतर शुक्रवारी पक्षाने टाळ-मृदंग वाजवून उपरोधिक गीत गाऊन आंदोलन केले. यावेळी ठाणेकरांच्या स्वप्नाचे झाले तुकडे तुकडे या गीतावर आंदोलकांनी ठेका धरला. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
कोपरी उड्डाणपुलाला गेलेल्या तड्यांची दोन ते तीन दिवसांपूर्वी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पाहणी केली. या पुलामुळे होणारी वाहतूककोंडीतून मुंबईत ये-जा करणाऱ्यांची सुटका होणार आहे. यासाठी ठाणेकर करदात्यांसह राज्यातील करदात्यांचे पैसे खर्च होत आहेत;मात्र उद्घाटनापूर्वी या पुलाला तडे गेले असून त्याच्या खालच्या कॉलमला लावलेले पिलर्स तुटले आहेत. यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
......
पूल उभारत असताना, आताच त्याच्या खालच्या कॉलमला लावलेले पिलर्स तुटले आहेत. तर पुलालादेखील तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन या पुलाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन केले.- रवींद्र मोरे, ठाणे शहराध्यक्ष, मनसे