ठाण्यात आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
By अजित मांडके | Published: May 29, 2024 04:49 PM2024-05-29T16:49:53+5:302024-05-29T16:51:50+5:30
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा विरोधआत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अजित मांडके, ठाणे : ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशा प्रकारच्या जोरदार घोषणाबाजी करत अजित पवार गटाने आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडविण्यात आले, तसेच फोटो जाळण्यात येऊन त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी अजित पवार गटाचे सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस रविंद्र पालव, महिला अध्यक्षा वनिता गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.
आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार आहेत. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले.
मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. बाबासाहेब यांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना व त्यांच्या सहकार्यांना अटक करायला हवी अशा प्रकारची मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.