पत्रीपुलाच्या संथ कामाविरोधात आंदोलन, मनसेकडून मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:16 AM2019-08-11T01:16:51+5:302019-08-11T01:17:09+5:30

कल्याण शहरातील पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

Protest against the slow work of Patripul | पत्रीपुलाच्या संथ कामाविरोधात आंदोलन, मनसेकडून मुंडण

पत्रीपुलाच्या संथ कामाविरोधात आंदोलन, मनसेकडून मुंडण

Next

कल्याण : शहरातील पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच, पुलावर शुक्रवारी झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या निषेधार्थ शनिवारी मनसेच्या पदाधिकाऱ्याने मुंडण केले. तर, अपक्ष नगरसेवक, रिपाइं, शेकाप व रिक्षा संघटनांनी रास्ता रोको करून वाहतूक अडवून धरली.

पत्रीपुलावर शुक्रवारी घडलेल्या अपघाताचा निषेध म्हणून मनसेचे शहर उपाध्यक्ष योगेश गव्हाने यांनी मुंडण केले. तर, पदाधिकारी राजन शितोळे, माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांनी राज्य रस्ते महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले. पत्रीपुलावरून बंदी असतानाही सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. ती बंद न केल्यास या वाहनांची तोडफोड केली जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लागावे, या मागणीसाठी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, रिक्षा संघटनेचे राकेश शर्मा, शेकापचे शहराध्यक्ष योगेश पटेल, राजू उजागरे आदींनी ठिय्या धरला. यावेळी त्यांनी पत्रीपुलावरील वाहतूक रोखून धरली होती. पत्रीपुलाचे काम कधी मार्गी लावले जाईल, याची डेडलाइन सांगावी. तसेच लेखी पत्र प्रशासनाने द्यावे, अन्यथा पुन्हा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीत वाहतूककोंडी

पत्रीपुलावर झालेले आंदोलन तसेच दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी आलेली बकरी ईद, अशा सलग तीन आलेल्या सुट्यांमुळे कल्याण-शीळ रोडवर शनिवारी मोठ्या प्रमाणावर वाहने आली. तसेच मॉलमध्ये सध्या सुरू असलेल्या विविध सेलमुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या वाहनांचीही त्यात भर पडली. त्यामुळे दुपारपासूनच वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

कल्याण-शीळ रोडवर काटईनाका परिसर, मानपाडा सर्कल ते सोनारपाडा परिसरातही वाहतूककोंडी झाली होती. त्यात खड्ड्यांमुळेही वाहतुकीचा वेग मंदावला होता. या कोंडीमुळे विद्यानिकेतनसह अनेक शाळांच्या बस त्यात अडकून पडल्या. सध्या परीक्षा सुरू असल्याने त्यांच्या वेळापत्रकांवरही परिणाम झाला. दरम्यान, पत्रीपूल परिसरात आंदोलन सुरू असताना याठिकाणची वाहतूक नेतिवलीमार्गे वळविल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

मनसे, अपक्ष नगरसेवक, रिपाइं, शेकाप आणि रिक्षा संघटनांचा रास्ता रोको साधारण अर्धा तास चालला. त्यामुळे पत्रीपुलावर कल्याण पश्चिम आणि पूर्वेच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनाची माहिती नसल्याने प्रवासी त्यात अडकून पडले. आंदोलनाच्या वेळी पत्रीपूल परिसरात कांदाबटाटा घेऊन जाणारा एक ट्रक पोलिसांच्या वाहनाला किरकोळ घासला गेला.

Web Title: Protest against the slow work of Patripul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.