अनोप मंडल संस्थेचा जैन समाजाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:54 AM2021-05-31T07:54:52+5:302021-05-31T07:55:06+5:30
समाज बांधवांनी केले आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ठाणे : जैन आचार्य यांचा पुतळा जाळून त्यांचा अवमान करणाऱ्या तसेच समाजाची बदनामी करणाऱ्या अनोप मंडल या संस्थेचा ठाण्यातील तमाम जैन बांधवांनी रविवारी सकाळी टेंभी नाका येथील श्री ऋषभदेव महाराज जैन धर्म मंदिर याठिकाणी निषेध करीत आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे यासंबंधी कारवाईचे निवेदन जैन संघटनेच्या वतीने देण्यात आले.
श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ, ठाणे आणि श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अॅन्ड ज्ञाती ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम सोलंकी तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त उदय परमार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनोप मंडल ही जैन आणि हिंदूविरोधी संघटना असून, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात जैन धर्म, जैन साधू आणि साध्वी यांच्याविरूद्ध लोकांच्या मनात विपर्यास्त विचार पसरविण्याचे काम करीत आहे.
भारतासह जगभरात येणारे प्रत्येक संकट आणि नैसर्गिक आपत्तीला जैन लोक कारणीभूत असल्याचा अपप्रचारही ही संघटना गावागावात करीत आहे. जैन साधू आणि साध्वी यांनी काळी जादू करून महापूर, कोरोनासारखे साथीचे आजार आणल्याचाही या अपप्रचारात समावेश आहे. रस्ते अपघातात अनेक पायी जाणाऱ्या जैन साधू आणि साध्वींचे अपघाती निधन झाले आहे. शेकडो साधूंच्या या अपघाती मृत्यू होण्यामागेही अनोप मंडल संघटनेचा हात असण्याची भीतीही जैन संघटनेने व्यक्त केली आहे. अनोप मंडलची चौकशी केली जावी. या संस्थेचे प्रमुख मुकनाराम प्रजापती यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी, त्याचबरोबर या संस्थेकडून चालविण्यात येणारे संकेतस्थळ, ट्विटर, एफबी, व्हॉट्सअॅप आणि यूटयूबसारखी सोशल मीडियाची खातीही बंद करावीत, तसेच या मंडळाविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली