उल्हासनगरात कोणार्क एनव्हायरा कंपनीच्या कामगारांचे आंदोलन
By सदानंद नाईक | Published: May 11, 2024 05:38 PM2024-05-11T17:38:42+5:302024-05-11T17:40:55+5:30
उल्हासनगर कचरा मुक्त या संकल्पनेखाली शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असून वर्षाला १८ कोटींपेक्षा जास्त महापालिका कचरा उचलण्यावर खर्च करते.
उल्हासनगर : महापालिका कचरा उचलणे व सफाईचे काम करणाऱ्या कोणार्क एनव्हायरा कंपणीच्या कंत्राटी कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. निवडणुक आचारसंहिता मध्ये आंदोलनास पोलिसांनी मनाई करून कर्मचारी व कंपनी प्रशासनात मध्यस्थी करून त्यांचा प्रश्न मिटविला आहे.
उल्हासनगर कचरा मुक्त या संकल्पनेखाली शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असून वर्षाला १८ कोटींपेक्षा जास्त महापालिका कचरा उचलण्यावर खर्च करते. याशिवाय प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत सफाईचे खाजगीकरण करून साफसफाईचा ठेका कोणार्क कंपनीला दिला. त्यावर वर्षाला ११ कोटीचा खर्च होतो. कोणार्क ग्रीन एनव्हायरा कंपनीच्या कामगारांनी आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ अचानक महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र निवडणूक आचारसंहिता काळात आंदोलन नको. अशी भूमिका पोलिसांनी घेतल्यावर सर्व कामगारांनी महापालिकेहून मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून, तेथे ठिय्या दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीची भूमिका वठवून कोणार्क कंपणीच्या प्रशासन सोबत चर्चा केली. अखेर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे मान्य केले आहे.
महापालिकेतील लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी कामगारांच्या आंदोलना नंतर कंपनी प्रशासनाने आरोग्य सुविधा देण्याचे माण्य केल्याचे सांगून आंदोलन मागे घेतले. शहरातील कचरा उचलणे, साफसफाईचे खाजगीकरण, डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा सपाटीकरण करणे आदी कामावर कोट्यवधीचा खर्च महापालिका करूनही समस्या जैसे थे आहेत. डम्पिंग वरील आग कायम असून शहर कचरा मुक्त झाले नाही. तसेच प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण करूनही शहरात कचऱ्याचे साम्राज्य व दुर्गंधी कायम आहे.