ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By सुरेश लोखंडे | Published: November 17, 2023 06:39 PM2023-11-17T18:39:47+5:302023-11-17T18:40:42+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर आंंदोलनात सहभागी,
ठाणे : येथील जिल्ह्याच्या आराेग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर सक्रीयपणे रूग्णाना सेवा देत आहे. शासकीय सेवेत सामावून घेण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी आज एकत्र येउन ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयाबाहेर शासकीय विश्रामगृहासमाेर धरणे आंदाेलन छेडले. त्यांच्या शिष्टमंडळाने येथील मुख्यमंत्री कक्षातील नायबतहसीलदार संताेष भाईर यांची भेट घेउन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी, कर्मचारी कृती समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागातील या एनएचएम विभागाचे विविध संवर्गातील कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आज शासकीय सेवेत समायोजन करण्यासाठी या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टरांनी धरणे आंदोलन छेडले.
विविध आरोग्य विषयक योजनांमधून जनतेला आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळापासून सेवा केली आहे. कंवारी पद्धतीवर नेमलेल्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी व अधिकान्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे. या आंदाेलनामध्ये परिचारक, परिचारिका, प्रयोगशाळा, उत्तर सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 'शासकीय सेवेत समायोजन करा" या एकमेव मागणी करिता आजही धरणे आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष या कर्मचाऱ्यांनी वेधले. आजच्या या धरणे आंदाेलनात आराेग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना आदींच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडले. यावेळी डॉ. मीना अंभोरे, शिवकुमार हकारे, स्मिता ठाकरे, हेमांगिनी जाधन,डॉ. रेण तिलाेकचंदानी, डॉ. झुल्फीकार खान आदींचा समावेश हाेता.