भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:49+5:302021-03-17T04:41:49+5:30
ठाणे : कोणताही समन्वय आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलल्याचा ...
ठाणे : कोणताही समन्वय आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलल्याचा आरोप करत भाजप ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाच्या काळातून आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
भाजप ठाणे शहर कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, ठाणे प्रभारी आमदार आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, यांची उपस्थिती होती.
या सभेत भाजपचे पदाधिकारी, प्रकोष्ट प्रमुख कार्यकारिणी सदस्य आणि मंडल स्तरावरील पदाधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. राज्यात वाढलेला कोरोनाचा कहर, महिलांवरील वाढते अत्याचार, राज्यपाल आणि लोकशाहीचा अनादर, श्रीराम भक्तांवर केलेली कारवाई, वाऱ्यावर सोडलेले शेतकरी, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अनास्था, कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती आदी बाबींमुळे महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे, अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
-----------