भिवंडीत पाणीटंचाई विरोधात पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन
By नितीन पंडित | Published: March 27, 2024 04:43 PM2024-03-27T16:43:41+5:302024-03-27T16:44:01+5:30
लालबावटा असंघटित कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर रिकामे हांडे बादल्या घेऊन बुधवारी धरणे आंदोलन केले.
भिवंडी: मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वत्र पाणीटंचाईचे चटके लागण्यास सुरुवात झाली असून शहरातील काही नागरी वस्त्या व विभागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निजामपूरा कसाई वाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणा वर पाणी टंचाई होत असल्याने तेथील स्थानिकांनी लालबावटा असंघटित कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर रिकामे हांडे बादल्या घेऊन बुधवारी धरणे आंदोलन केले. यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सध्या रमजान महिना सुरू असून मुस्लिम समाजाला पाण्याची नितांत गरज असताना या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासन असमर्थ ठरले असल्याने नागरिकांना हे पाऊल उचलावे लागले असून यास महापालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असून यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आचारसंहितेची तमा न बाळगता अधिक उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा कोम्रेड विजय कांबळे यांनी यावेळी दिला आहे.