उल्हासनगर महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन; कंत्राटी कामगारांचे उपोषण
By सदानंद नाईक | Published: August 9, 2023 06:06 PM2023-08-09T18:06:06+5:302023-08-09T18:06:12+5:30
उल्हासनगर महापालिका विविध विभागात ठेकेदाराद्वारे शेकडो कंत्राटी कामगार घेण्यात आले.
उल्हासनगर : महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या उपोषणांनंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाची प्रत दिली नसल्याच्या निषेधार्थ कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांच्यासह अन्य जणांनी महापालिका मुख्यालय समोर ठिय्या आंदोलन केले. संगनमताने चाललेला भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
उल्हासनगर महापालिका विविध विभागात ठेकेदाराद्वारे शेकडो कंत्राटी कामगार घेण्यात आले. तसेच कोरोना महामारीच्या वेळी महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटी वॉर्डबॉय यांचा ठेका संपल्याचे सांगून कामावरून कमी केले. दरम्यान कोरोना रुग्ण वाढणार या भीतीने, राजकीय दबाव आल्याने, ठेकेदाराद्वारे कंत्राटी पद्धतीने त्यांना कामावर घेतले. मात्र ठेकेदार कमी वेतन देत असल्याचा आवाज त्यांनी उचलताच ठेकेदाराचा ठेका मुदत संपल्याचे कारण देऊन रद्द केला. त्यामुळे वॉर्डबॉय यांचा संसार उघडयावर आला. तोच प्रकार इतर कंत्राटी कामगारांचा असून त्यांनाही शासनाच्या नियमानुसार वेतन न देता, कमी दिल्याचा प्रकार राज असरोंडकर यांनी उघड केला. तसेच याविरोधात उपोषण केले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी असरोंडकर यांनी उपोषण मागे घेण्यासाठी, कंत्राटी कामगाराच्या कमी वेतना बाबत एका समितीची स्थापना केली. मात्र समितीच्या अहवालाची प्रत महापालिका असरोडकर यांना देत नसल्याने, त्यांनी सहकार्यासह महापालिका मुख्यालय समोर बुधवारी भ्रष्टाचारी चलो जाओ असे म्हणत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
९ ऑगस्ट पासून महापालिका अधिकाऱ्यांविरोधात 'चलेजाव' लोकचळवळ सुरू केल्याचे असरोंडकर म्हणाले. 'भ्रष्टाचारी चले जाव' हे आंदोलन केवळ कंत्राटी कामगारांच्या प्रश्नापुरतं मर्यादित असून उल्हासनगर महानगरपालिकेत बोकाळलेल्या एकूणच भ्रष्टाचाराविरोधात आहे. या भ्रष्टाचाराला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राज असरोंडकर यांनीकेला असून त्यामुळेच मनपा आयुक्तांपासून कोणीही अधिकारी सर्वसामान्यांच्या कोणत्याही तक्रारींना जुमानत नसल्याचं प्रतिपादन असरोंडकर यांनी केलं आहे.
भ्रष्टाचार आणणार चव्हाट्यावर
महापालिकेचा एकून कारभार पाहता, राज्य सरकारकडून कारवाईची अपेक्षा नसल्याने 'भ्रष्टाचारी चले जाव' मोहिम सुरू केली. या मोहिमेत सर्व सामान्य नागरीक सहभागी होणार असून शहरात फिरून, महापालिका प्रशासन, राजकीय पक्ष, नेते व सरकार यांचा संगनमताने चाललेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार असल्याचा इशारा असरोंडकर यांनी यांनी यावेळी दिला आहे.