ठाण्यात २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून मराठा समाजाने केला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:09 PM2018-08-09T14:09:21+5:302018-08-09T14:11:09+5:30
आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला.
ठाणे - सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९ आॅगस्टचा बंद ठाण्यात असणार नसल्याचे सांगितले असले ठाण्याचा वेग मात्र गुरुवारी कमी झालेला दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक ठिकाणी उत्सुफुर्तपणे मॉल, दुकाने सकाळच्या सत्रात बंद होती. तसेच रस्त्यावर वाहतुकही कमी होती. तर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी १० ते ११ या वेळेत शहरातील विविध सहा ठिकाणी २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली. तर सीमेवर वीर मरण पत्करलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनासुध्दा श्रंध्दाजली वाहण्यात आली. परंतु तोंडाला काळ्या पट्या लावून सकल मराठा समाजाने शासनाचा निषेधही केला.
मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नसल्याचे बुधवारीच सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. समाजातील तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय सर्वानुमते सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुतात्म्यांना सकाळी १० ते ११ वा. या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अष्टविनायक चौक (कोपरी), कळवा नाका, वर्तकनगर नाका, वागळे प्रभाग समिती, सुरज वॉटर पार्क (वाघबीळ) या सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्तारोको अथवा घोषणाबाजीसुध्दा यावेळी करण्यात आली नाही. येत्या १६ आॅगस्ट रोजीसुध्दा पुढील आंदोलन केले जाणार असून त्याची दिशा लवकरच ठरविली जाईल असेही यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु २५ जुलै रोजी जो काही प्रकार झाला त्यानंतर असा प्रकार होऊ नये यासाठी मराठा समाजाच्या मंडळींनी काळजी घेऊन केवळ श्रंध्दाजली वाहीली.
सकल मराठा समाजाने ज्या सहा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय शहरातील मुख्य हायवे, मुख्य रस्ते, घोडबंदर भागातील रस्ते याठिकाणीसुध्दा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तर काही ठिकाणी ड्रोन कॅमेºयाची नजर सुध्दा ठेवण्यात आली होती. परंतु २५ जुलै सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास काय करायचे अशी काहीशी भितीसुध्दा अनेकांच्या मनात होती. त्यामुळे शहरातील बहुसंख्य शाळांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर ज्या ठिकाणी परीक्षा सुरु होत्या, त्या ठिकाणी विद्यार्थी मात्र परीक्षेसाठी हजर होते. तर शहरातील महाविद्यालये सुरु असली तरी देखील तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी कमी होती. शिवाय रोज गजबजलेले रस्त्यांवर मात्र शुकशुकाट होता. वाहनांची संख्यासुध्दा रोडावल्याचे दिसून आले, रस्ते मोकळे होते, शहरातील मॉलसुध्दा सकाळच्या सत्रात बंद होते. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुध्दा सुरळीत सुरु होती. परंतु असे जरी असले तरी एकूणच बंदच्या पार्श्वभूमींवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक दुकानदारांनी, खाजगी आॅफीसेस, व्यावसायिक यांनी सकाळ सत्रात आपली सेवा बंद ठेवली होती.